scorecardresearch

महिला भवनाचे लोकार्पण

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्याकरिता पालिकेकडून महिला भवनाची निर्मिती करण्यात आली आहे.

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्याकरिता पालिकेकडून महिला भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक वर्षे ओस पडलेल्या महापौर निवासस्थानात फेरबदल करून हे भवन तयार करण्यात आले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून महापौरांच्या हस्ते या भवनाचे लोकार्पण होणार आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मीरा रोड पूर्वेच्या कनाकिया भागात २००४ साली सुविधा भूखंड जागेवर कनाकिया बिल्डरने महापौर निवासस्थान तसेच नजीकच्याच ठिकाणी आयुक्त बंगल्याचे बांधकाम मोफत करून दिले होते. याकामी कनाकिया बिल्डरला प्रशासनाने टीडीआर दिला होता. २००५ साली राष्ट्रवादीच्या निर्मला सावळेझ्र्कांबळे महापौर झाल्या. या महापौर बंगल्याचा वापर करणाऱ्या त्या एकमेव महापौर होत्या. त्यांच्या २००५-०७ या कालावधीनंतर आजपर्यंत एकाही महापौराने या बंगल्याचा वापर केलेला नाही. सध्याच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनीही निवासस्थानाची दुरवस्था पाहून येथे राहण्यास नकार दिला होता. त्यामुळेच आता या महापौर निवासस्थानाचा वापर महिला भवनासाठी करण्याचे निश्चित झाले. महापौर निवासस्थानाचे क्षेत्रफळ ५०० चौ.मी. इतके आहे. सदर इमारतीमध्ये अंतर्गत बदल व सुशोभीकरण केल्यास त्याचा वापर महिला भवनासाठी करता येऊ शकेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. महिला भवनासाठी महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत गेल्या वर्षांच्या अर्थसंकल्पात तीन कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार या भवनाची निर्मिती पूर्ण झाली असून आजच्या महिला दिनी त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली.

महिला भवनातील सुविधा

महिलांकरता मोफत योग प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, लघुउद्योग, कापडी पिशवी निर्मिती प्रशिक्षण, सॅनिटरी पॅडनिर्मिती प्रशिक्षण आणि इतरही काही प्रशिक्षण सुविधा दिल्या जाणार आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहितीही येथे मिळेल.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dedication of mahila bhavan empower women work construction ysh

ताज्या बातम्या