१२० दशलक्ष लिटर पाण्याची तूट

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असली तरी हजारो नागरिकांना नवीन नळजोडण्या मिळणार नाही. 

धरणे भरली तरी पाणीटंचाई; वसई-विरार शहराला नवीन नळजोडण्या नाही

वसई: वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असली तरी हजारो नागरिकांना नवीन नळजोडण्या मिळणार नाही.  शहराला १२० दशलक्ष लिटर पाण्याची तूट होत असल्याने नवीन नळजोडण्या देणे शक्य होणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना टॅँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या पालिकेने २४ लाख गृहीत धरली आहे. सध्या शहराला सूर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २०० दशलक्ष लिटर, उसगाव आणि पेल्हार मधून ३० दलशक्ष लिटर्स असा मिळून दररोज २३० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असतो. वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. दररोज नवनवीन इमारती उभ्या राहत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पालिकेकडे पाण्यासाठी नळजोडणीचे अर्ज येत आहेत. परंतु पालिकेने नवीन नळजोडण्यांना परवानगी देणे मागील वर्षांंपासून बंद केले होते. नवीन नळजोडण्या जून महिन्यापासून देण्यास सुरुवात केली जाईल, असे पालिकेने सांगितले होते. पंरतु जुलै महिना संपत आला तरी पालिकेने नवीन नळजोडण्या दिलेल्या नाहीत.

पाणी मुबलक असताना पालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे तसेच नवीन नळजोडण्या देण्यात येत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. सध्या पालिकेकडे दोन हजार ३०८ नवीन नळजोडण्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. काही महिन्यांपासून पालिकेने नळ जोडण्यांचे अर्ज स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

प्रतीमाणशी १३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना पालिकेकडून केवळ ११० लिटर पाणी सरासरी दिले जात आहे. शहरातील २४ लाख लोकसंख्येला ३५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र कमी पाणी आणि पाण्याची गळती मिळून दरररोज शहराला १२० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे नवीन नळजोडण्या सध्या देता येत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतर नवीन नळजोडय़ांचे काम हाती घेण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

आधीच पाणीटंचाई त्यात वितरण व्यवस्था नाही

शहरला  दररोज १२० दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावत आहेत.  शहराच जलवाहिन्यांचे वितरण पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या आहेत. शहरात नव्याने जलवाहिन्यांचे जाळे अंथरण्यासाठी  अमृत योजना हाती घेतली होती.त्याअंतर्गत २८५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या. मात्र प्रत्यक्षात १८५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.  तसेच १८ जलकुंभापैकी केवळ सहा जलकुंभ बांधून पूर्ण झाले असून १२ जलकुंभांचे काम बाकी आहे. त्यामुळे पाणी आले तरी ते वितरीत करता येणार नाही, अशी अडचण आहे.

सध्या शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने पाण्याची मागणी देखील वाढत आहे. मात्र सध्या १२० दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावत आहे. ती आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत

-एम.जी. गिरगावकर,  शहर अभियंता, वसई-विरार महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deficit of 120 million liters of water vasai virar ssh