वसई: हिवाळा सुरु झाला कि हंगामी फळं, हंगामी भाज्या, रानभाज्या, यासह बाजारात जर काही दिसून येत असेल तर ती म्हणजे विविध प्रकारची कंदमूळं. हिवाळा सुरु होताच वसई विरारमधील बाजारपेठांमध्येही राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागात उगवली जाणारी कंदमूळं मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. तर खरेदीदारांकडून असणाऱ्या मागणीमुळे यंदा सर्वच कंदमुळांच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे.
वसई विरार शहरात ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता शहरावर हळू हळू थंडीची चादर पसरू लागली आहे. हिवाळ्यात सर्दी, ताप अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात बदल करतात. त्यामुळे हंगामी फळे, भाज्या, रानभाज्या आणि खासकरून कंदमुळांची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढते.
वसई विरार शहरात मागील काही वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे बाजारात रताळी, बिट, गाजर, सुरण अशा वर्षभर उपलब्ध असणाऱ्या कंदमुळांसोबत विवीध प्रकारची कंदमुळे दाखल झाली आहेत. यंदा बाजारात रताळ्यांसह काटेकणगी, करांदे, वेल करांदे, कोनफळ, शिंगाडे, पांढरे कंद, अरबी, शलगम, हळद अशी वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळे दिसून येत आहेत. तर महाराष्ट्रातील चंद्रपूर, नाशिक तसेच कर्नाटक, केरळ राज्यातून कंदमुळे यंदा बाजारात दाखल झाली आहेत. तर वाढती मागणी ठराविक महिन्यांचा हंगाम यामुळे कंदमुळांच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणारी काटेकणगी २२० रुपये प्रतिकिलो, सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणारे शिंगाडे १५० ते १८० रुपये प्रतिकिलो दराने, पांढरे कंद, अरबी, कोनफळ, शलगम १२० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने, करांदे, वेल करांदे १०० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. तर हिवाळ्यामुळे वर्षभर उपलब्ध असणाऱ्या कंदमुळांच्या दरातही वाढ झाली आहे. एरवी ८० रुपये प्रतिकिलो दराने विकत मिळणारी रताळी आता १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. याचबरोबर बिट, गाजर, मुळा, सुरण या कंदमुळांच्या किंमतीतही ३० ते ४० रुपये वाढ झाली आहे.
आयुर्वेदिक गुणधर्मामुळे पांढऱ्या आणि पिवळ्या हळदीला मागणी
हिवाळा सुरु होताच बाजारात सर्वच भाजी विक्रेत्यांकडे कच्ची हळद आवर्जून दिसून येते. यंदाही बाजारात पांढऱ्या आणि पिवळ्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हळदीच्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे हिवाळ्यात लोणची, वेफर्स, हळदीचा रस अशा विविध स्वरूपात तिचा दैनंदिन आहारात समावेश केला जातो. तर हिवाळ्यात जाणवणारी सांधेदुखी, कोरडी त्वचा अशा समस्यांवर उपाय म्हणून नागरिकांकडून हळदीची मागणी वाढली आहे.
