भाईंदर :- भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर पती विनोद मेहता यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप करणाऱ्या जान्हवी डेव्हलपर्सचे भागीदार विकासक देवराम मंडोरा याला मिरा रोड पोलिसांनी फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. ‘दामोदर टॉवर’ इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट घेतल्यानंतर कंत्राटदाराची एक कोटी सहा लाख ८४ हजार ८८८ रुपयांची देणी न दिल्याचा आरोप मंडोरा याच्यावर आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये मंडोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवघर पूर्व येथील दामोदर टॉवरच्या बांधकामाचे काम पी.डी. एंटरप्रायझेसला देण्याबाबत संपर्क केला. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये २,१८५ रुपये प्रति चौरस फुट या दराने ५० हजार ६८४ चौरस फुट बांधकामाचा कामाचा आदेश देण्यात आला.नोव्हेंबर २०२१ पासून बांधकाम सुरू करण्यात आले. कंत्राटदाराने सुमारे ७ हजार ६०२ चौरस फुट काम पूर्ण केले. त्याची बिलाची रक्कम एक कोटी ६६ लाख ११ हजार ७५० रुपये होती.
मात्र, मंडोरा यांनी कंत्राटदार किंवा त्याच्या अभियंत्याच्या अनुपस्थितीत बांधकामाची मोजणी करून केवळ ६ हजार ३७१ चौरस फुट काम झाल्याचे दाखविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.याशिवाय साहित्याची किंमत वजा केल्यानंतरही जीएसटीसह एक कोटी ६ लाख ८४ हजार ८८८ रुपये कंत्राटदाराला देणे बाकी होते. मात्र, सुरुवातीला केवळ एक लाख ५१ हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर बांधकामाचे उर्वरित काम अन्य कंत्राटदाराकडे सोपविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना मिरा रोड पोलिसांनी बुधवारी पहाटे देवराम मंडोरा याला अटक केली. आर्थिक व्यवहारांबाबत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. यातील जितेंद्र मंडोरा फरार असून खेतसिंह मेडतिया अन्य एका प्रकरणात आधीपासूनच कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.काही दिवसापूर्वीच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आपला इमारतीचा भोगवटा दाखला थांबवला असल्याचे आरोप केले होते. यासाठी विकास प्रकल्पात दहा टक्के भागीदारी आणि महापौरांचे पती विनोद मेहता यांनी एक रूम मागितल्याचे आरोप केले होते.
