वसई : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ढाबेचालक आणि कंपन्यांनी गिळंकृत केला आहे. नैसर्गिक नाले बुजवून ढाबे आणि अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत यामुळे यंदाच्या पावसाळय़ात महामार्ग पुन्हा पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब पोलिसांनी तयार केलेल्या अहवालात उघड झाली आहे. हा अहवाल सादर होताच शासकीय यंत्रणांची भंबेरी उडाली असून खासदारांनी ७ दिवसांत सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत

गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई-विरारच्या हद्दीतून जातो. या परिसरात असलेल्या नाल्यात भराव करून बेकायदा बांधकामे केली जात आहेत. पाणी वाहून जाणारे नाले बुजविले जात असल्याने मागील दोन वर्षांपासून पावसाळय़ात महामार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत आहे. मात्र एवढे जलसंकट ओढवूनही त्यापासून महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी काहीच बोध घेतलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनीच पुढाकार घेऊन या भागाचे सर्वेक्षण केले. कुठे कुठे भराव झाले, कुणी कसे नाले बुजवले याचा छायाचित्रांच्या आधारे अहवाल तयार केला. मंगळवारी हा अहवाल खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला. यामुळे महापालिकेसह, महसूल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची भंबेरी उडाली.

महामार्गावरील नैसर्गिक नाले मोकळे करम्ण्याचे आणि संबंधितांवर ७ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असे खासदार  राजेंद्र गावित,  खासदार यांनी सांगितले आहे.

बंध झालेले नैसर्गिक नाले 

महामार्गावरील रिलायन्स ग्रेनाईट अ‍ॅण्ड मार्बलसमोर डोंगरातून येणारा नैसर्गिक नाला दुकानदाराने अडवला आहे. पाण्याचे गटार अरुंद पाइपलाइन टाकून रस्त्याचे मधून पाठीमागे सोडले आहे. याच पावसाचे पाणी साचून राष्ट्रीय महामार्ग २-३ तास वारंवार बंद पडला होता. काठीयावाडी ढाब्यासमोर आरएमसी प्लान्टवाल्यांनी नाल्यामध्ये भराव टाकून बंद केला आहे. त्याने समोरील नैसर्गिक नाला अडवला आहे. अंबीका/इंडीयन ऑइल पेट्रोल पंपसमोरील रोडबाजूचे गटार बंद करण्यात आले आहे. महामार्गावरील कच्छ दरबार हॉटेल, श्रीमातेश्वरी ढाबा, जैन शिकंजी आणि हॉलीडे ढाबा मालकांनी पावसाच्या पाण्याचे निचरा होणारे नाले बंद केले आहे.

महामार्गावरील नाल्यांची साफसफाईच नाही

महामार्गावरील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचे तसेच चुकीचे काम झाल्याचे पोलिसांनी आपल्या अहवालातून दाखवून दिले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वरसावे खाडी पुलापासून वसई वाबुकरे ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले तयार करण्यात आले आहेत.परंतु या नाल्यांमध्ये दगड, माती व कचरा साचला आहे. 

वरसावे नवीन पुलाजवळ एनर्जी आणि थोरात कंपनीजवळ २०० मीटर लांबीचे गटार करण्याऐवजी केवळ २० मीटर लांबीचे गटार बनविण्यात आहे. पुलाच्या भरावाच्या बाजूने रस्त्याला उतार असून त्याचा निचरा होण्याची अद्यापपर्यंत तरतूद केलेली नाही. टीम्मी फार्मसमोरील नाला गाळ साचून बंद पडला आहे.

पोलीस आयुक्त विजयकांत सागर (मुख्यालय) यांनी वाहतूक पोलिसांच्या वतीने हा अहवाल सादर करून केला. पावसाळय़ात पाणी जाण्याचा मार्ग बंद होऊन महामार्ग पाण्याखाली जातो. त्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी होत असते, असे विजयकांत सागर यांनी सांगितले आहे.  

त्यावर खासदार राजेंद्र गावित यांनी महापालिका तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना  धारेवर धरले. नाले बुजविणाऱ्या धाबे आणि हॉ़टेलांवर कारवाई

करून सात दिवसांच्या आत नैसर्गिक नाले मोकळे करण्याचे आदेश त्यांनी दिली. १ जून रोजी पुन्हा याबाबत बैठक घेऊन आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.