वसई: छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्र घेतला आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काँग्रेसने आज (२८ एप्रिल) वसईत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकताच नागपूर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा’ मंदिराचा शिलान्यास सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर आयोजित धर्मसभेमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी एक किस्सा सांगितला.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना यांना आपण आता थकलोय असे वाटू लागले, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले व त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, “मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही.”

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. तसेच महाराष्ट्रभरातील शिवप्रेमींनी आणि राजकीय पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तर वसई शहरातही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहेत.

त्यांच्या या वक्तव्याचा निषेधार्थ वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आंदोलन पुकारणार आहे. जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वसईतील पारनाका येथे हे आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस, ब्लॉक कमिटी, महिला आघाडी, विविध सेल आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी केली आहे.