भाईंदर:- मिरा भाईंदर शहरात गेल्या काही काळात खून, घरफोडी, दरोडा तसेच भरगर्दीत पाकीट मारणे, मोबाईल चोरणे अशा विविध घटना घडत असल्याचे समोर येत आहे. याच दरम्यान भाईंदर येथील एका उच्चभ्रू वस्तीतील इमारतीत देखील हिऱ्यांचा हार अचानक गायब झाल्याची घटना घडली. सर्वत्र शोधाशोध केल्यावर हा हार कचऱ्यात गेला असल्याचे हार मालकाच्या लक्षात आले. पण, तर सोसायटीची सफाई करणाऱ्या दांपत्याला हा हार सापडला. पण, हार सापडल्यानंतर सफाई कर्मचारी असणाऱ्या दांपत्याने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे.
भाईंदर पूर्वेच्या गौरव गॅलेक्सी फेस-१ या परिसरात राहणारे गीतादेवी रंगू यांचे कुटुंब अनेक वर्षापासून राहत आहे. शुक्रवारी(५ डिसेंबर) हिऱ्यांचा हार गहाळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.संपूर्ण घराची झाडाझडती घेतल्यानंतर हार सापडला नाही.हार कचऱ्याच्या डब्यात गेल्याचा संशय त्यांना होता. याबाबत हार मालकांनी संपूर्ण सोसायटीची साफसफाई करणारे रमेश रामदरी बैध व त्यांची पत्नी पल्लवी बैध यांना सांगितले.परिसरातील सर्व कचऱ्याच्या डब्यात शोध घेण्यात आला.तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर कचऱ्याच्या डब्यात हिऱ्यांचा हार सापडला.या सफाई कर्मचाऱ्यांनी हिऱ्यांचा हार प्रामाणिकपणे संबंधित मालकाला परत केला.
कामगार संघटनेचे प्रभाकर गायकवाड यांना या घटनेची माहिती मिळताच.संबंधित सफाई कर्मचाऱ्यांची भेट घेत दहा लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार मालकाला सुपूर्त केला. हे दाम्पत्य मागील २७ वर्षापासून भाईंदर पूर्व परिसरात साफ सफाईचे काम करत आहे.या अगोदर देखील मौल्यवान दागिने हरवल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यावेळी कचऱ्याच्या डब्यात लाखो रुपयांचे ऐवज सापडले होते.यात सफाई कर्मचारी दांपत्यांनी मौल्यवान दागिने संबंधित व्यक्तींना परत केले होते. या सफाई कर्मचाऱ्यांवर संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हार परत करणाऱ्या दांपत्याचा सत्कार
भाईंदर येथील उच्चभ्रू इमारतीतील कुटुंबाच्या घरातून दहा लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार अचानक गहाळ झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तर घरभर शोधाशोध केल्यानंतर कचऱ्याच्या डब्यात हार गेला असल्याचा अंदाज कुटुंबीयांनी बांधला. त्यानंतर इमारतीत सफाईचे काम करणाऱ्या दांपत्याने या हिऱ्यांच्या हाराचा शोध घेऊन तो कुटुंबाला परत केला. त्यामुळे हार परत करणाऱ्या दांपत्याचा कामगार संघटना व संबंधित सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. तसेच, त्यांचा हा प्रामाणिकपणा समाजासाठी अतिशय प्रेरणादायी ठरत असल्याचे देखील इमारतीतील रहिवाशांनी म्हटले.
