वसई: वसई विरार भागात शहरीकरण मोठया प्रमाणत होत असतानाही साहित्याची चळवळ जोपासली जात आहे, हे महत्वाचे आहे. मराठी भाषा अजून समृद्ध होण्यासाठी स्थानिक बोली भाषेतील शब्दांची जोड तिला मिळायला हवी, असे प्रतिपादन गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. विरार येथे आयोजित साहित्य जल्लोष कार्यक्रमात ते बोलत होते.
वसई-विरार शहर महानगरपालिका (ग्रंथालय विभाग), ज्ञानदीप मंडळ, संत जोसेफ महाविद्यालय (सत्पाळा) आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ वा साहित्य जल्लोष कार्यक्रम सत्पाळ्यातील संत जोसेफ महाविद्यालय रविवार, १२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात सत्पाळा नाका ते संत जोसेफ महाविद्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीने करण्यात आली. या दिंडीत उपमहापौर मार्शल लोपिस व साहित्यिक मॅक्सवेल लोपिस सहभागी झाले होते. त्यानंतर केशरी आंब्याच्या रोपाला पाणी देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते साहित्य जल्लोषचे उद्घाटन पार पडले.
यावेळी महापौर अजीव पाटील, अभिनेते अरुण नलावडे ,मधुकर भावे, कवी अरुण नलावडे, कवी अशोक नायगावकर, उपमहापौर मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड्र्यूय कोलासो, प्रकाशक अशोक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना, वसई शहराला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. सध्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
परंतु या ठिकाणचा हा जल्लोष वेगळा असल्याचे म्हणत ज्येष्ठ गझलकार डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी आयोजकांच्या सातत्याचे कौतुक केले. तसेच साहित्य ही प्रेमाची परिभाषा आहे,यात द्वेष नाही. सध्या माणसांना घेऊन हा कार्यक्रम करणे हे अप्रूप आहे.आजही साहित्य चळवळीला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.
