भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी अखेर डिंपल मेहता यांची मंगळवारी बहुमताने निवड झाली. तर उपमहापौरपदाची जबाबदारी ध्रुव किशोर पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर महापौरपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, मंगळवारी या पदासाठी महापालिका मुख्यालयातील सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून सौरभ कटियार उपस्थित होते. सुरुवातीला सभागृहात प्रशासनातर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.
यात भाजपचे ७९ आणि काँग्रेसशिवसेनेच्या एकत्रित ‘मिरा भाईंदर शहर विकास आघाडी’चे १६ नगरसेवक सहभागी झाले.यावेळी महापौरपदासाठी उभ्या असलेल्या डिंपल मेहता यांना ९५ पैकी ७९ मते मिळून त्या विजयी झाल्या. तर शहर विकास आघाडीच्या उमेदवार रुबीना शेख यांना १६ मतांवर समाधान मानावे लागले. उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांचीही याच मतांनी निवड झाली.
त्यानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सभागृहाला भेट देऊन दोघांचे स्वागत केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
उपमुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली न दिल्यामुळे नाराजी
मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी मंगळवारी विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली देण्याबाबत शोकप्रस्ताव मांडण्याची तोंडी मागणी पिठासीन अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे केली. मात्र शोकप्रस्ताव मांडल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येणार नसल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार समर्थक नाराज झाल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते आसिफ शेख यांनी केला आहे.

