वसई: पालिकेच्या कचरा भूमीवरील कचऱ्याचे साचलेले डोंगर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बायोमायनिंग प्रकल्पाच्या द्वारे आतापर्यंत सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.अजूनही संपूर्ण कचरा नष्ट करण्यासाठी दोन वर्षे इतका कालावधी लागणार आहे.

वसई विरार शहारात वाढत्या नागरिकरणामुळे दैनंदिन निघणारा कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.दररोज शहरातून आठशेहून अधिक मॅट्रिक टन इतका कचरा संकलित करून गोखीवरे येथील कचरा भूमीवर नेऊन टाकला जात आहे. यापूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेचा कोणताही प्रकल्प नसल्याने विल्हेवाटीसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे एका वर एक असे कचऱ्याचे ढिगारे साचून त्याचे डोंगर तयार झाले होते.या वाढत्या कचऱ्यामुळे कचरा टाकण्यास ही पालिकेला जागा अपुरी पडत होती. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा भूमीवर बायोमायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. मे साई युटिलिटी या संस्थेला वीस वर्षांसाठीचे काम देण्यात आले आहे. सुमारे १५ लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम १५ जानेवारी पासून सुरू करण्यात आले आहे.  ट्रॉमल यंत्रणेद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे.

हेही वाचा >>>मिरा भाईंदर शहरात आढळली ९ तीव्र कुपोषित बालके, संख्या १७ वर

या विल्हेवाट प्रक्रियेला वेग आला आहे. विल्हेवाटीसाठी ३ ट्रॉमल यंत्र असून त्याद्वारे काम सुरू आहे.  आतापर्यंत पालिकेच्या कचरा भूमीवरील सव्वा दोन लाख मॅट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.उर्वरित कचऱ्यावर  टप्प्या टप्प्याने विल्हेवाट लावली जात आहे संपूर्ण कचरा मोकळा करण्यासाठी साधारणपणे दोन वर्षे इतका कालावधी लागेल असे पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले आहे.

आग व दुर्गंधीचे प्रमाण कमी होणार

याआधी कचरा पडून असल्याने रासायनिक वायू  तयार होऊन आगी लागण्याच्या घटना घडत होत्या. त्याचा धूर हवेत सर्वत्र पसरत असल्याने नागरिकांचा कोंडमारा होत होता. आता कचरा हळू हळू कमी होत असल्याने कचऱ्याला आगी लागण्याचा घटना कमी होणार आहेत तर दुसरीकडे दुर्गंधीचे प्रमाण कमी होणार आहे.

उघड्यावर कचरा  टाकण्याचे प्रकार सुरूच

वसई विरार शहराच्या वाढत्या अनधिकृत चाळी यामुळे अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत.यापूर्वी पालिकेने सर्वाधिक कचरा टाकण्याची ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी विविध कलाकृती साकारून ते कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहेत. हा कचरा रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेच्या समोर आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर विल्हेवाट प्रक्रिया झाली आहे. कचरा कमी करून जागा मोकळी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.-नानासाहेब कामठे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन )