वसई: शहरातील बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी वसई-विरार महापालिकेने सर्व डॉक्टरांच्या गुणपत्रिका तपासण्याचा घेतलेला निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाला डॉक्टरांकडून मोठा विरोध झाला होता. त्याऐवजी पालिकेने सर्व नोंदणीकृत डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या संकेतस्थळावरून तपासणी केली आहे.
वसई-विरार शहरातील बोगस डॉक्टरांचे प्रकरण ‘लोकसत्ता’ने नुकतेच उघडकीस आणले होते. अनेक डॉक्टर कसल्याही प्रमाणपत्राशिवाय शहरात दवाखाना चालवत होते तर अनेक नामांकित डॉक्टरांनी देखील बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोंदणी करून परवानगी मिळवली होती. पालिकेचा माजी वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर याने तर कसलेही प्रमाणपत्र नसताना पालिकेत नोकरी मिळवून थेट मुख्य वैद्यकीय अधिकारी पद मिळवले होते. याप्रकरणानंतर पालिकेने खरा डॉक्टर कोण हे शोधण्यासाठी केवळ त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रच नाही तर त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षांच्या गुणपत्रिका तपासण्याचे ठरवले होते. त्यामुळे कुणी बोगस प्रमाणपत्र बनवले असले तरी अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्षांच्या गुणपत्रिकेमुळे त्यांचे बिंग फुटणार होते. मात्र या निर्णयाला शहरातील सर्वच डॉक्टरांच्या संघटनेने विरोध केला. काही ठराविक बोगस डॉक्टरांमुळे आमची तपासणी करणे योग्य नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली होती. या विरोधामुळे पालिकेने डॉक्टरांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील गुणपत्रिका तपासणी मोहीम थांबवली आहे.
सर्व डॉक्टरांच्या नोंदणीची तपासणी
• महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करायचा असेल तर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (मेडिकल काऊन्सिल) चे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक असते. अशा सर्व अधिकृत डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच उपयोजनावर (अॅवप) मध्ये असते. त्यामुळे पालिकेने या संकेतस्थळावरून सर्व डॉक्टरांच्या नोंदणी तपासल्या आहेत.
• आम्ही सर्व डॉक्टरांना गुणपत्रिका तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनेक डॉक्टरांनी त्या जमा केल्या होत्या. मात्र काही डॉक्टरांचा विरोध होता. त्यामुळे आम्ही आता गुणपत्रिका न तपासता महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या संकेतस्थळावरून त्यांचे नोंदणी Rमांक तपासले आहेत, अशी माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली. शहरात जे डॉक्टर व्यवसाय करतात आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणी केलेली आहे, ते सर्व डॉक्टर अधिकृत आहेत असेही त्यांनी सांगितले.