scorecardresearch

तोतया डॉक्टरला एका गुन्ह्यात जामीन, दुसऱ्या गुन्ह्यात अटक

वसईतील तोतया डॉक्टर हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे याने ज्या ज्या रुग्णालयात उपचार केले आहेत त्या रुग्णालयात जाऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

‘उपचारग्रस्त’  रुग्णांच्या  जबाबाची नोंद

वसई : वसईतील तोतया डॉक्टर हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे याने ज्या ज्या रुग्णालयात उपचार केले आहेत त्या रुग्णालयात जाऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हेमंत पाटील याने केलेल्या उपचारांमुळे अपाय झालेले रुग्ण आता पोलिसांपुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, हेमंत पाटील याला एका गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या  गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तोतया डॉक्टर हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे याच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही तो अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून उपचार आणि शस्त्रक्रिया करत असल्याबद्दल वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाली. मात्र पोलिसांनी लगेच त्याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. पाटील याने ज्या ज्या रुग्णालयात जाऊन रुग्णांची तपासणी केली त्या सर्व रुग्णालयांत जाऊन पोलीस तेथील रजिस्टर तपासत आहेत.

वसई विरार शहरातील अनेक रुग्णालयात हेमंत पाटील हा बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्ण तपासत होता. त्या रुग्णांचे जबाब आम्ही नोंदवत आहोत अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. दरम्यान हेमंत पाटील याच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने लगेच त्याचा ताबा भाईंदर पोलीस घेणार आहेत.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Doctor granted bail arrested case ysh

ताज्या बातम्या