भाईंदर :- मिरा-भाईंदर शहरातील पाळीव श्वानप्रेमींसाठी स्वतंत्र डॉग पार्क उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी उड्डाणपुलाखालील जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिरा-भाईंदर शहरात मोकाट आणि पाळीव श्वानांची संख्या मोठी आहे. यामध्ये मोकाट श्वानांसाठी महापालिकेने निर्बीजीकरण केंद्र व पशू रुग्णालय उभारले आहे. याशिवाय निवारा केंद्र उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले असून या श्वानांना वेळोवेळी लसीकरण देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पाळीव प्राण्यांना परवाने देण्याचे धोरणही निश्चित करण्यात आले आहे. आता यात एक पाऊल पुढे टाकत पाळीव प्राण्यांसाठी ‘डॉग पार्क’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवर नव्याने उभारण्यात आलेल्या मेट्रो पुलाखालील जागा ठरवण्यात आली आहे. त्यानुसार डॉग पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे कार्यादेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.
असे असणार पार्क…
नव्याने उभारण्यात येणाऱ्या डॉग पार्कमध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांसाठी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये प्राणी शौचालय, खाद्य कक्ष आणि खेळण्यासाठी स्वतंत्र खेळणी उभारली जाणार आहेत. याशिवाय येथे श्वानांसोबत येणाऱ्या नागरिकांसाठीही सोयी असणार आहेत. शहरात डॉग पार्कची उभारणी झाल्यास प्राणीप्रेमींना एकत्र येऊन भेटण्याची संधी मिळेल, अशी माहिती महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली.
निवरा केंद्रची जागा निश्चित
मिरा-भाईंदर शहरात श्वान निवारा केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने उत्तन येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जागेची निवड केली आहे. त्यामुळे सदर जागा ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर निवारा केंद्र उभारण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

