सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई: वसईकरांना घरगुती पाइपलाईन गॅस स्वस्त म्हणजे निम्म्या दरात देण्याची दिवाळी भेट वसई-विरार महापालिकेने नागरिकांना दिली आहे.  विशेष म्हणजे पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली  आहे.

वसईकरांना गेल्या अनेक वर्षांपासून पाइप गॅसची प्रतीक्षा होती. केंद्र सरकारने वसई-विरारसह पालघर जिल्ह्याला घरगुती पाइप गॅसपुरवठा करण्याचे काम गुजराथ गॅस कंपनीला दिले आहे. यासाठी वसई-विरार शहरात आठ इंच व्यासाच्या २३० किलोमीटर लांबीच्या गॅस वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी खोदकाम करणे आणि पुन्हा खोदलेली जमीन पूर्ववत करावी लागणार आहे. या कामासाठी पालिकेने प्रती मीटरचा दर हा सात हजार ११५ रुपये एवढा आकारला होता. २३० किलोमीटर वाहिन्या टाकण्यासाठी हा दर दीडशे कोटींच्या घरात गेला असता.

त्यामुळे पालिकेने हा दर कमी करावा असे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी पालिकेला सांगितले होते. पालिकेने हा दर कमी केल्यास कंपनीचा गॅस शहरात आणण्याचा खर्च कमी होईल आणि परिणामी नागरिकांना देखील कमी दरात गॅस मिळणार असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. नागरिकांच्या हितासाठी आयुक्त गंगाथरन यांनी देखील या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला आणि दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता गुजराथ गॅस कंपनील गॅस वाहिन्या अंथरण्यासाठी प्रति मीटर ७ हजार ११५ रुपयांऐवजी ३ हजार ७२९ रुपये एवढे शुल्क आकारावे लागणार आहे.

पहिल्या टप्प्याचे काम सुरू

नागरिकांना पाइप गॅस लवकर मिळावा यासाठी टप्प्य्याटप्प्याने कामाला सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २६ किलोमीटर लांबीच्या गॅसवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. नवीन दराप्रमाणे ९ कोटी ७७ लाख रुपये आणि भूभाडे (प्रति मीटर ५ रुपये) यानुसार २६ लाख रुपये असे एकत्रितपणे १० कोटी ३ लाख रुपये गुजराथ गॅसने महापालिकेला दिले आहेत.  पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशीप, (६.५ किलोमीटर) वसई पश्चिमेकडील राजहंस (३.७ किलोमीटर) तसेच वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी आणि वसंत नगरी येथे (२६.२ किलोमीटर)  येथे अंथरण्यात येणार आहे.

घरगुती पाइप गॅससाठी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. कामाला प्रत्यक्ष सुरुवात तर झाली आहे, शिवाय गॅस आणण्याचा खर्च कमी झाल्याने नागरिकांना कमी दरात घरगुती गॅस मिळणार आहे.

-क्षितिज ठाकूर, आमदार, नालासोपारा

२०१२ मध्ये महापालिकेच्या महासभेने ठराव करून दरनिश्चिती केली होती. मात्र या दराने गुजराथ कंपनीला गॅस आणण्याचा खर्च मोठा झाला असता आणि नागरिकांवर भुर्दंड बसला असता.   म्हणून दर कमी करण्यात आला आहे.

-राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई विरार महापालिका

नागरिकांना गॅस स्वस्त दरात मिळावा म्हणून आम्ही दर कमी केले आहेत. पहिल्या टप्प्याच्या रकमेचा भरणा कंपनीने केला आहे.  रस्ते पुर्नबांधणीचे कामाच्या स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या असून कामाला सुरूवात झाली आहे.

गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका