भाईंदर : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मिरा-भाईंदरमध्ये विविध माध्यमातून निधी संकलन सुरू असताना, दुष्काळग्रस्तांच्या नावाखाली अनधिकृतपणे निधी गोळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे.

मिरा-भाईंदर भाजपकडून ‘सहाय्यता निधी’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी मिरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच शहरातून जवळपास सहा कोटी रुपये जमा करून मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्धार भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शहरात निधी संकलनाची मोहीम सुरू आहे.मात्र, दुष्काळग्रस्तांच्या नावाखाली काही व्यक्ती आणि संस्था परवानगीशिवाय निधी गोळा करत असल्याची बाब निदर्शनास आल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जनतेने अशा व्यक्ती अथवा संस्थांच्या हातात पैसे देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतच मदत द्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी किंवा शासनाने अधिकृत केलेल्या यंत्रणेमार्फतच मदत द्यावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे. निधी संकलनासाठी संबंधितांकडे जिल्हा प्रशासनाची अधिकृत परवानगी आणि पावती आहे का, याची खात्री करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

अनधिकृत निधी संकलनावर कारवाईची मागणी

मिरा-भाईंदर परिसरात दुष्काळग्रस्तांच्या नावाखाली निधी गोळा करणाऱ्यांच्या परवानग्यांची तातडीने पडताळणी करावी. तसेच विनापरवानगी निधी संकलन सुरू असल्यास ते तत्काळ थांबवून, जनतेची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.