वसई : विरार येथे ठाकूर कुटुंबीयांनी उभारलेल्या भव्य द्वारकाधीश मंदिराचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. गेली सात ते आठ वर्ष चालेल्या बांधकामानंतर बुधवारी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते द्वारकाधीश मंदिराचे द्वारोद्घाटन करण्यात आले. पण, गुरुवारी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या वचनामृत कार्यक्रमात शंकराचार्यांनी केलेल्या विधानामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. मी कार्यक्रमात येऊ नये म्हणून मला चक्क अंडरवर्ल्डची भीती वसई विरारमधील काही लोकांनी घातली, असा खुलास त्यांनी यावेळी केला. त्यामुळे शंकराचार्यांना अशी भीती घालणारे लोक कोण? आणि खरंच हा कार्यक्रमात मोडता घालण्याचा प्रयत्न होता का? असे तर्कवितर्क अनेकांकडून लावले जात आहेत.
विरारमधील शिरगाव येथे माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या पुढाकाराने भव्य प्रति द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आले आहे. सोमपूरा परिवारातील कुशल कारागिरांकडून हे मंदिर घडवण्यात आले आहे. मूळ मंदिरांप्रमाणे कोणत्याही लोखंडी सळी किंवा साच्याचा वापर न करता बन्सी पहाडपूर दगड वापरून ९० फूट उंचीचे हे मंदिर इंटरलॉक पद्धतीने नागरशैलीत हे मंदिर बांधण्यात आले आहे. मूळ द्वारका मंदिराला गोमती नदीच्या समोर असलेल्या ५६ पायऱ्यांप्रमाणेच या प्रतिकृतीतही ५६ पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. तसेच, मूळ मंदिराप्रमाणेच ५२ गजांची उंच ध्वजा येथे डौलाने फडकावली जाणार आहे. तसेच या मंदिरासमोर एक भव्य गरुडस्तंभही उभारण्यात आला आहे.
बुधवारी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते या मंदिराचे द्वार उघडण्यात आले. शंकराचार्यांचे शिरगाव येथे आगमन होताच त्यांच्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जगदुरू शंकराचार्य स्वामि अविमुक्तेश्वरांनंद यांच्या बरोबरच सनातनी किन्नर आखाडा विष्णूमोहिनीराज मठ खानिवडे,मधुसिद्धी बाके आखाडा परिवार,श्री रवींद्र महाराज ,नालासोपारा स्वामी गंगादासजी स्वामी राममंदिर विरार,हस्यमजी महाराज भगवंताचार्य काशी,अवधूत आक्रम,सोपारा, बिशप थॉमस डिसोझा , फादर मायकल, शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर,सिने अभिनेता संजय दत्त, सुदेश बेरी, यांच्या सह अनेक राजकीय नेते, कलाकार यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
तर द्वारकाधीश मंदिरात भाविकांसाठी गुरुवारी (२७ नोव्हेंबर) वचनामृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारण्याबाबत शंकराचार्यांनी मोठा खुलासा केला आहे. यावेळी ते म्हणाले की, “हा कार्यक्रम ठरला तेव्हा मुंबई आमचा चातुर्मास सुरु होता. त्यानंतर आम्ही वाराणसीला गेलो. तिथे असताना विरारमधील या कार्यक्रमाचे आम्हाला निमंत्रण आले. पण, त्याचवेळी वसई विरारमधील काही लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जिथे जात आहात तिथे जाऊ नका. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डची संबंध आहे.इतकच नव्हे तर त्यांनी पुढे हेही सांगितलं की शंकराचार्यांची एक शंभर एकर जमीन आहे. त्यावर या लोकांनी कब्जा केला आहे.”
माहितीच्या पडताळणीसाठी समितीची स्थापना
पण, लोकांनी सांगितलेल्या माहितीवर विश्वास न ठेवता शंकराचार्यांनी या माहितीची पडताळणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही ठरवलं की आम्ही या गोष्टीची तपासणी करू आणि त्यानंतर जर असं काही आढळलं तर कार्यक्रम रद्द करू. आम्ही तीन लोकांची समिती स्थापन केली. त्यातला एक व्यक्ती आमच्या मठातली होती आणि दुसरे दोन इसम मुंबईचे होते. तर त्या समितीने आम्हाला सांगितलं की,या कुटुंबातील एक व्यक्ती आहे जिच्याबद्दल हे सगळं बोललं जातं. पण ती घटना फार जुनी आहे आणि आता हे कुटुंब धर्मकार्य त्यांनी समाजकार्यात खूप पुढे निघून गेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
राहता राहिला मुद्दा शंकराचार्यजींच्या शंभर एकर जमिनीचा तर त्यावर या लोकांनी काही कब्जा केलेला नाही. जेव्हा ठाकूर राजकारणात होते तेव्हा त्यांच्या समर्थन करणाऱ्या लोकांपैकी काहीजण या सामील होते त्यामुळे ठाकूर यांचे नाव त्या लोकांसोबत जोडलं जात आहे. हा अहवाल आल्यानंतर आम्ही आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
