वसई: सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात एका तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. यावेळी त्या तरुणाने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करीत रील पोस्ट केली होती. या तरुणाला आचोळे पोलिसांनी ताब्यात घेत चांगलाच धडा शिकवला आहे.

आताच्या काळात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेक रीलस्टार कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईक्स व फॉलोअर्स वाढविणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. मात्र, याच नादात अनेकदा त्यांच्याकडून गंभीर चुका घडतात, ज्याचा परिणाम समाजावर होतो. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नालासोपारा पूर्वेकडील आंबावाडी परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दलित समाजाविरोधात काही आक्षेपार्ह शब्द वापरून आणि रील बनवून ती सोशल मीडिया वरती वायरल केली होती. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. काही दलित समाज बांधवांनी याची तक्रार आचोळे पोलीस ठाण्यात केली होती.

आचोळे पोलिसांकडे तक्रार येताच पोलिसांनी रीलस्टार तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी जर कोणी कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावरकायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी दिला आहे.

कारवाई होताच तरुणाकडून माफी

आक्षेपार्ह रील तयार करून पोस्ट तयार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. गणेश झा असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून कारवाई होताच तरुणाने माफी मागितली आहे. माझ्या रीलमुळे ज्या ज्या समाजाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची सर्वांची माफी मागितली असून तसा व्हिडीओ ही प्रसारित करण्यात आला आहे.