वसई: प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण म्हणजे ईस्टर संडे. आज वसईत मोठ्या उत्साहात आणि भक्ती पूर्ण वातावरणात हा सण साजरा करण्यात आला. मृत्यूवर विजय मिळवून प्रभू येशू जिवंत झाल्याच्या आनंदात ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थनासभेत सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती परंपरेत एक गंभीर, अंतर्मुख करणारा आणि आत्मशुद्धीचा असा चाळीस दिवसांचा प्रायश्चित काळ (लेंट) पाळला जातो. राखेचा बुधवार म्हणजे ॲश वेन्सडेपासून ईस्टर संडेपर्यंत हा काळ पाळला जातो. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करून देणाऱ्या पवित्र प्रायश्चित्त काळात भाविक प्रार्थना, त्याग, उपवास आणि दानधर्माद्वारे आध्यात्मिक शुद्धीकरण करतात व पापांबद्दल क्षमायाचना मागतात.
शनिवारी मध्यरात्रीपासूनच वसईतील विविध प्रसिद्ध चर्चमध्ये या सणाच्या निमित्ताने विशेष प्रार्थनेचे (मिस्सा बलिदान) आयोजन करण्यात आले होते. मेणबत्त्यांच्या प्रकाशात प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा विधी साजरा करण्यात आला. तसेच ख्रिस्त जिवंत झाला आहे, असा जयघोष करत भाविकांनी आनंद व्यक्त केला. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व प्रमुख चर्चबाहेर कडक बंदोबस्त तैनात केला होता.
ईस्टर सणाचे महत्त्व विशद करताना संत मायकल चर्चचे फादर असिस रॉड्रिग्ज म्हणाले की, “मरणाने त्याने मृत्यू नष्ट केला, मरणातून उठून त्याने आपले आयुष्य पूर्ववत केले,” हे शब्द केवळ प्रार्थनेतील ओळी नसून ते मानवी जीवनाला नवी दिशा देणारे महामंत्र आहेत. ईस्टरचा हा काळ आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवासाची आठवण करून देतो—तो प्रवास म्हणजे ‘मृत्यूपासून तारणापर्यंतचा.”
चाळीस दिवसांच्या उपवासाचा (लेंट) काळ संपल्यानंतर वसईकरांच्या घराघरात खास मेजवानीचा बेत आखण्यात आला होता. वसईचा पारंपरिक ख्रिस्ती समाज आपल्या पारंपरिक पोषाखात चर्चमध्ये दाखल झाला होता. तसेच परदेशात व परराज्यात कामानिमित्त गेलेले वसईकरसुद्धा या खास सणासाठी आपल्या गावी परतल्याचे पाहायला मिळाले.
