वसई: दिवाळी सणानिमित्त बाजारात विविध प्रकारच्या पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, सणाला पर्यावरणपूरकतेची जोड देता यावी यासाठी वसईतील ‘वसई जिल्हा गोसेवा गतिविधि’ या सामाजिक संस्थेने देशी गाईच्या शेण व मातीच्या मिश्रणातून विशेष ‘गोमय पणत्या’ तयार केल्या आहेत. हा उपक्रम केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोलाचा ठरत नसून, गोशाळांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. यादिवशी घराचे मुख्यद्वार, अंगण दिव्यांनी सजवले जाते. पूर्वी मातीपासून तयार केलेल्या व नाजूक नक्षी असलेल्या पणत्यांचाच वापर सजावटीसाठी केला जायचा. मात्र, अलीकडच्या काळात प्लॅस्टिकच्या पणत्या, चायनिज पणत्या, रसायनयुक्त रंग व मण्यांनी सजवलेल्या मातीच्या पणत्यांची त्यांची जागा घेतली. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ‘वसई जिल्हा गोसेवा गतिविधि’तर्फे गेल्या पाच वर्षांपासून गोमय पणत्यांची निर्मिती केली जात आहे.

ग्रामीण भागातील गोशाळांमधील देशी गाईंचे शेण आणि गोशाळेतील माती एकत्र करून या पणत्या बनवल्या जातात. केवळ शेणापासून बनवलेली पणती पूर्ण जळून नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यात योग्य प्रमाणात मातीचा वापर केला जातो, जेणेकरून त्या सुरक्षित राहतात. विशेष म्हणजे, दिवाळी संपल्यानंतर या पणत्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यांचा मऊ लगदा तयार होतो, जो झाडांसाठी उत्तम जैविक खत म्हणून वापरता येतो. त्यामुळे कोणताही कचरा निर्माण न होता नैसर्गिक चक्र कायम राहते, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली.

या प्रकल्पाच्या विपणन प्रमुख समीक्षा म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोशाळा केवळ दानावर किंवा देणगीवर अवलंबून राहू नयेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. दूध देणे बंद झालेल्या किंवा भाकड झालेल्या गाईंना रस्त्यावर सोडून दिले जाते. मात्र, अशा गाईंचे शेण आणि गोमूत्र यांच्यापासून धूप, गोनाइल (फ्लोर क्लिनर) आणि गोमय पणत्या यांसारख्या रोजच्या वापराच्या वस्तू बनवून गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जात आहे. वसईतील सनातन गोशाळा या उपक्रमामुळे आज पूर्णपणे आत्मनिर्भर बनली असून, विरारपासून बोरिवली, कांदिवली, मालाड आणि अंधेरीपर्यंत त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्रचंड मागणी आहे.

सुलभ आणि थेट विक्री

ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा अतिरिक्त खर्च आणि पॅकेजिंग शुल्क टाळून नागरिकांना वाजवी दरात या पणत्या मिळाव्यात, यासाठी थेट वितरणावर भर देण्यात आला आहे. १ डझनच्या (१२ नग) पॅकिंगमध्ये उपलब्ध असलेल्या या पणत्यांची किंमत ६० रुपये प्रति डझन (५ रुपये प्रति पणती) ठेवण्यात आली आहे. वसई, विरार येथील स्थानिक केंद्रांवर या पणत्या उपलब्ध असून, अधिक माहिती व खरेदीसाठी नागरिकांनी ८०८७३९१४४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.