वसई: लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, संधी दिली आहे. पण काही नगरसेवकांना आपण निवडून आलो की पूर्ण शहराचा सातबाराच आपल्या नावावर झालाय असे वाटू लागते, पण असं होता कामा नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या नगरसेवकांना दिला. भाईंदर उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिंदे शिवसेनेच्या ६० नगरसेवकांसाठीच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतर प्रथमच उपमुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधला. आपल्या राजकीय प्रवासाचा दाखला देत शिंदे म्हणाले, मी स्वतः विधानसभेत शेवटच्या बाकावर बसायचो, आज अनुभवातून आणि कामाच्या जोरावर पहिल्या बाकावर आलो आहे. बाळासाहेबांच्या संकल्पनेतून ‘नगरपिता’ ऐवजी ‘नगरसेवक’ शब्द आला. नगरसेवक हे जनतेचे सेवक असतात, हे विसरू नका. नगरसेवकांना कामाला लावण्यासाठी त्यांनी विकासात पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या प्रभागाला १ कोटी रुपयांचे विशेष बक्षीस तर सर्वात शेवटी राहणाऱ्या नगरसेवकाचे पुढील निवडणुकीत तिकीट कापण्याचा इशारा दिला. या दोन दिवसीय शिबिरात क्लस्टर डेव्हलपमेंट, स्मार्ट सिटी, महापालिका अधिनियम, नगरसेवकांचे अधिकार-कर्तव्ये, वॉर्ड बजेट आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर याविषयी नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

​महापालिकांच्या कामाचे ऑडिट होणार

​कंत्राटदारांच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवताना शिंदे म्हणाले, कंत्राटदार वेळेत कामे करत नाहीत आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांच्या कामांचे ‘ऑडिट’ केले जाईल. तसेच, अधिकाऱ्यांशी गोड बोलून कामे करून घ्या. तुम्ही राग दाखवला तर अधिकारी तुम्हाला नियमांवर बोट ठेवून अडवतील असा व्यावहारिक सल्लाही शिंदे यांनी नगरसेवकांना दिला.

विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास नको

​पर्यावरणाच्या गंभीर समस्येवर भाष्य करताना शिंदे स्पष्ट म्हणाले, “ग्लोबल वॉर्मिंगमुळे दोन-तीन तासांत एका महिन्याचा पाऊस पडतोय. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारताना वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. नगरसेवक आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, ती समान वेगाने धावली तरच शहरांचा कायापालट होईल.

म्हात्रे वर कायदेशीर कारवाई सुरू

रमेश म्हात्रे प्रकरणी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. म्हात्रे यांनी ही आपली चूक मान्य केली आहे. परंतु डॉक्टर, अधिकारी असतील त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारचे कृत्य होणे चुकीचे आहे त्याचे आम्ही कधीही समर्थन करणार नाहीत. याशिवाय म्हात्रे यांच्यावर पक्षाकडून शिस्त भंगाची कारवाई करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी सांगितले.