भाईंदर :-एकीकडे मिरा भाईंदर शहरात भाजप-शिवसेना यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचत असताना, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी चक्क भाजप आमदारांच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे या घटनेचा फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी शहरात आले होते. यावेळी कार्यक्रमात स्थानिक नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता हे दोघेही या नेत्यांसोबत उपस्थित होते.प्रामुख्याने स्थानिक पातळीवर आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात मागील काही वर्षांपासून तीव्र वाद सुरू आहे. परिणामी, राज्यात एकत्र असलेले शिवसेना-भाजप पक्ष येथे मात्र एकमेकांचे कडवे विरोधक आहेत.

त्यामुळे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते शहरात आल्यावर नेमकी काय परिस्थिती असेल, याकडे कार्यकर्त्यांचे सतत लक्ष असते.मात्र, मंगळवारी मेट्रोने प्रवास करून जिन्याने खाली उतरत असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या पुढे असलेल्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या खांद्यावर सहज हात ठेवला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, सरकत्या जिन्यावरून खाली उतरत असताना त्यांचा हात बराच वेळ त्यांच्या खांद्यावर होता.

हे दृश्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही घटना उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून त्याचे फोटो व व्हिडिओ तयार केले. त्यानंतर हे फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, ‘मेहतांच्या खांद्यावर एकनाथ शिंदेचा हात’ अशी मिश्किल टीका नेटकरी करत आहेत.