भाईंदर :- २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सरकारमुळे मेट्रोचे काम ठप्प झाले होते. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच आपण २०२३ मध्ये मुख्यमंत्री झालो, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

लोकार्पणानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रोचे भूमिपूजन केले होते. त्याच प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात होत असल्याचा आनंद आहे. मात्र २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सरकारच्या काळात या कामाला ब्रेक लागला होता. त्यावेळी सत्तेत असलेल्यांचा पाय ब्रेकवर होता, तर माझा पाय एक्सलेटरवर आहे.त्यामुळे ,मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठीच मी २०२३ मध्ये मुख्यमंत्री झालो. भूसंपादन आणि पुनर्वसन यांसारखी कठीण कामे आम्ही पूर्ण केली. त्यामुळेच आज हा प्रकल्प पूर्णत्वास आला अ असल्याचे शिंदे म्हणाले.दरम्यान, शिंदे यांनी नाव न घेता केलेल्या टीकेमुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.