वसई: मोबाईलमध्ये अचानक वाजणारा बीप, जाणवणारी तीव्र कंपनं आणि त्यानंतर येणारा आपत्कालीन सूचनेचा संदेश यामुळे सकाळपासूनच वसई विरारकरांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संदेश नेमकं कोण पाठवतंय? खरंच हा शासनाकडून पाठवण्यात आलेल्या संदेश आहे की मग हा कोणत्या सायबर हल्ल्याचा प्रकार आहे? असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावू लागले आहेत. पण, तुमच्याही मोबाईलवर असा एखादा संदेश प्राप्त झाला असेल तर घाबरण्याचं कारण नाही.

कारण हा भारत सरकारच्या एका मोहिमेचा भाग आहे. त्यामुळे नेमकी ही मोहीम काय? आणि ती का राबवली जात आहे याची माहिती आपण घेणार आहोत:

ही मोहीम नेमकी आहे काय?

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएकडून देशभरातील आपात्कालीन दळणवळण यंत्रणा अधिक मजबूत आणि प्रभावशाली व्हावी म्हणून ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम’ची देशव्यापी चाचणी केली जात आहे. यासाठी शनिवार, २ मे २०२६ या दिवसाची निवड करण्यात आली आहे. तर चाचणीच्यापूर्वी याबाबत पूर्वसूचना देणारा संदेश नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला होता.

चाचणी दरम्यान नेमकं घडतं काय?

आपत्तीच्या काळात नागरिकांपर्यंत तात्काळ सूचना पोहोचवता याव्यात यासाठी भारतात नवीन सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. या सिस्टीमची चाचणी आज सरकारकडून केली जात आहे. यात नागरिकांच्या मोबाईल स्क्रीनवर अचानक एक आपत्कालीन संदेश दिसतो. तसेच या सूचनेबाबत एक विशिष्ट आवाज किंवा तीव्र कंपने देखील जाणवतात. हा संदेश एक टेस्ट मेसेज असून याचा उद्देश यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी करणे आहे.

आपत्कालीन संदेशात नेमकं काय?

“भारताने आपल्या नागरिकांसाठी त्वरित आपत्ती सूचना देणारी सेवा स्वदेशी तंत्रज्ञान वापरून सेल ब्रॉडकास्ट सेवा सुरू केली आहे. सतर्क नागरिक, सुरक्षित राष्ट्र. हा संदेश मिळाल्यावर जनतेला कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे. – भारत सरकार”, अशा प्रकारचा संदेश नागरिकाच्या मोबाईलवर येऊ शकतो.

नव्या सेवेचा प्रणालीचा उपयोग नेमका काय? भूकंप, त्सुनामी, वीज पडणे, गॅस गळती किंवा रासायनिक धोका अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या काळात सरकारकडून नागरिकांपर्यंत थेट मोबाईल द्वारे संदेश किंवा माहिती  पोहोचवता यावी, यासाठी ही नवीन यंत्रणा विकसित करण्यात आलेली आहे. यापूर्वीही या नव्या प्रणालीची चाचणी करण्यात आली होती. मात्र, आता याची देशव्यापी चाचणी करून कार्यक्षमता व विश्वासार्हता तपासली जात आहे. ही चाचणी यशस्वी होताच ही प्रणाली देशभरात विविध भाषांमध्ये लागू केली जाईल.