वसई – सम्राट अशोक यांनी दिलेला अहिंसा, शांती आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही तितकाच प्रस्तुत असून, समाजात शांतता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी केले. नालासोपारा येथील ऐतिहासिक बौद्ध स्तूपावर सम्राट अशोकांच्य २३३० वी जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा येथे अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप आहे. याच ऐतिहासिक स्तूपावर सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वसई विरार महापालिकेचे महापौर यासह विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी नालासोपारा येथील बौद्ध स्तूप हा सम्राट अशोक यांच्या काळातील बौद्ध धम्म प्रसाराचा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या प्राचीन वारशाचे महत्त्व अधोरेखित करताना महापौरांनी त्याच्या संवर्धनाबाबत प्रशासकीय भूमिका स्पष्ट केली. स्तूप परिसराच्या विकासासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना महापालिकेच्या वतीने प्राधान्याने केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. माजी हितेंद्र ठाकूर व आमची टीम ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नेहमीच सहकार्य करत आली आहे आणि भविष्यातही हे सहकार्य कायम राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यमाच्या निमित्ताने परिसरात स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रमही राबवण्यात आले. तर सांस्कृतिक कार्यक्रम ही मोठ्या उत्साहात पार पडले. यात विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक कलाकारांनी बौद्ध धर्मावर आधारित गीते, नृत्य आणि नाट्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा शेवट सर्वांनी एकत्र येऊन शांततेचा संदेश देत केला.
