वसई: वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात करार स्वरूपात कर्मचारी यांना रुजू करून घेण्यात आले होते. मात्र त्यांचा कालावधी संपुष्टात आला असतानाही ते सेवेत कायम राहिले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वसई विरार महापालिकेने करोनाच्या संकटकाळात पालिकेची रुग्णालये, कोव्हीड- १९ रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, माताबाल संगोपन केंद्र व दवाखाने या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी हे सहा महिने किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी या कालावधीसाठी घेण्यात आले होते. यात काहींना १२ ऑक्टोबर २०२१ तर काहींना २१ डिसेंबर २०२१ रोजी नियुक्तीचे आदेश दिले होते.
परंतु या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा कामाचा कालावधी संपुष्टात आला आहे. यात काही मे २०२२ मध्ये तर काही कर्मचारी मार्च २०२२ मध्ये त्यांच्या कामाचा कालावधी संपला आहे. असे असतानाही हे कर्मचारी आजतागयत सेवेत कार्यरत आहेत. त्यांना १३ एप्रिल २०२२ रोजी सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे पत्रही पालिकेने दिले आहे. हे कर्मचारी करोना काळात तात्पुरत्या स्वरूपात करार स्वरूपात घेतले होते. त्यांच्या सेवेची कालमर्यादा संपली असून त्यांना कोणतीही मुदतवाढही दिली नाही. तरीही ते सेवेत कसे काय राहू शकतात असा प्रश्न भटके विमुक्त आघाडीचे अशोक शेळके यांनी उपस्थित केला आहे. त्यांचे वेतन, भत्ते व इतर बाबींवर अतिरिक्त खर्च झाला असून त्या खर्चाचा अतिभार हा पालिकेच्या तिजोरीवर पडला आहे याला जबाबदार कोण ? असा प्रश्न शेळके यांनी केला आहे. पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे कालमर्यादा संपून हे कर्मचारी कामावर कायम राहिले आहेत. या प्रकरणाची चौकशी सखोल चौकशी करून जे कोणी अधिकारी याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीचे युवा सह संयोजक अशोक शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कर्मचारी
स्त्रीरोगतज्ज्ञ ३, बालरोगतज्ज्ञ १, नेत्रशल्यचिकित्सक १, भीषक २, मायक्रोबायोलॉजीस्ट २, वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) ४८, जी.एन.एम. १०७, ए.एन.एम १०६ , फार्मासिस्ट २१, प्रयोगशाळा सहाय्यक २४, क्ष-किरण सहाय्यक ११ अशा एकूण ३२६ पदांचा यात समावेश आहे.