‘स्वच्छ भारत’ मोहिमे अंतर्गत उभारणी; देखभालीकडे मात्र दुर्लक्ष

विरार : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत वसई-विरार महापालिकेने शहरात मोठय़ा प्रमाणात शौचालयाचे जाळे उभे केले आहे. परंतु अजूनही अनेक शौचालयांची उभारणी अपूर्ण आहे. तसेच, उभारलेल्या शौचालयांची नियमित देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने मोठी दुरवस्था झाली आहे.

वसई-विरार महापालिकेने घरोघरी शौचालय उभारणीच्या योजनेअंतर्गत पालिकेने १० हजारांहून अधिक शौचालये बांधली आहेत. यात शेकडो सार्वजनिक शौचालयेसुद्धा आहेत. पण अजूनही अनेक शौचालये पूर्ण झालेली नाहीत.

अनेक शौचालयांचे काम अपूर्ण असतानाही त्याची देयक पालिकेने दिली आहेत. मुळात अनेक शौचालयांत पाणी, वीज नाही. काही ठिकाणी शौच खड्डेच नाहीत तर काही ठिकाणी शौचकुंभ नाहीत. अनेक शौचालयांना दरवाजे नाहीत. काही ठिकाणच्या लाद्या फुटल्या आहेत तर काही ठिकाणी शौचालयाची देखभाल होत नसल्याने नागरिकांनी त्यांचा वापर बंद केला आहे.

अनेक ठिकाणी शौचालय न बांधताच त्याची आकडेवारी जोडल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भातील काही उदाहरणे समोर आली आहेत. यातील प्रभाग समिती ‘क’ येथील कौलदांडी परिसरात पालिकेने शौचालय बांधले आहेत. पण याचा शौचखड्डाच तयार केलेला नाही तसेच पाण्याची व्यवस्थासुद्धा केली नाही. यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

अनेकदा पालिकेला सांगूनही त्याचे काम केले जात नाही. तर प्रभाग समिती ‘आय’मधील अमोल नगर नायगाव, येथे चार बैठकांचे शौचालय बांधण्याची निविदा पालिकेने काढली होती. हे काम २ लाख ७० हजार किमतीचे होते. पण हे काम पूर्ण न होताच या कामाचे देयक पालिकेने ठेकेदाराला दिले आहेत.

अपूर्ण कामे

विरारच्या प्रभाग ‘सी’अंतर्गत फुलपाडा परिसरात अशाच प्रकारचे पाच आसनाचे शौचालय पालिकेने बांधले होते. परंतु दोन वर्षे झाली तरी या शौचालयाचे काम अपूर्ण आहे. या ठिकाणी शौचालय बांधल्यानंतर पालिकेने वीज, पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा वापर करताच आला नाही.

शौचालयावर झाडेझुडपे

वसई पूर्व सातिवली परिसरात पालिकेने २०१७- १८ मध्ये तारक नगर परिसरात सार्वजनिक शौचालय बांधले, पण या शौचालयाला मैला वाहून नेण्यासाठी मार्गाच बनविले नाही. यामुळे स्थानिकांनी याचा वापर करणे बंद केले. मागील चार वर्षांपासून नागरिक या शौचालयाच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत. परंतु पालिकेने या शौचालयाकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही. यामुळे ही शौचालयाच्या आजूबाजूला झाडे झुडपे वाढून मोठे जंगल तयार झाले आहे. तसेच शौचकुपात मोठमोठी झाडे उगवली आहेत. शौचालयांना वेली आणि झुडपांचे मोठे आवरण निर्माण झाले आहे. यामुळे शासनाचे कोटय़वधी रुपये पालिकेने वाया घालविले आहेत.

या संदर्भात प्रभाग समिती स्तरावर माहिती दिली आहे. त्यांची पाहणी करून लवकरच ही शौचालये दुरुस्त केली जातील आणि नागरिकांना त्याचा वापर करता येईल.

– राजेंद्र लाड, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग