शाळेत बोलावून परीक्षा

शाळेने शक्कल लढवत मुलांना शाळेच्या गणवेशात न बोलावता साध्या कपडय़ांवर बोलाविले.

खासगी शाळेकडून करोना नियमांचा भंग; विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश

विरार : करोनाकाळात अजूनही शाळांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नसताना विरारमधील एका खासगी शाळेने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांची परीक्षा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गट शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु शाळा बंद असतानाही या शाळेने परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

विरार पश्चिमेकडील विद्याविहार इंग्लिश विद्यालयाकडून प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता सोमवारी ८ वी १०च्या  विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे शाळेत शेकडो मुलांनी एकत्र बसून परीक्षा दिली आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पूर्णत: ओसरला नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने शाळकरी विद्यार्थ्यांची शिकवणी व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी शाळा त्यांचे उल्लंघन करताना दिसत आहे. विरार पश्चिमेकडील विद्याविहार या शाळेत सोमवारी सकाळी ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी होते.

शाळेने शक्कल लढवत मुलांना शाळेच्या गणवेशात न बोलावता साध्या कपडय़ांवर बोलाविले. इंग्लिश, मराठी व हिंदी या विषयाच्या लेखी परीक्षा या वेळी घेण्यात आल्या. वसई तालुक्यातील सर्वच शाळांना मुलांचे शिक्षण व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत, मात्र असे असले तरी विरारच्या विद्याविहार इंग्लिश शाळेत मुलांच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या.

या प्रकाराबाबत शाळेत जमलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विचारणा केली असता त्यांनी शाळेकडूनच परीक्षेसाठी बोलविल्याचे सांगितले. शाळेच्या या बेजबाबदार वागण्यामुळे एखाद्या  विद्यार्थ्यांला करोनाची बाधा झाली तर त्यास कोण जबाबदार राहील असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराबाबत वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधवी तांडेल यांनी या प्रकरणी पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

शाळेतील मुले एक ते दीड वर्षांपासून शाळेत आलेली नाहीत. त्यामुळे त्यांना पेपरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या. शासनाने दिलेल्या करोनाचे सर्व नियम पाळून आम्ही विद्यार्थ्यांना बोलावले होते. एक मेज सोडून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते.

– मंगला परब, संचालिका, विद्याविहार इंग्लिश विद्यालय

सदर शाळेने मुलांना बोलावून लेखी परीक्षा घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या शासनाकडून कोणत्याही शाळेला, शाळा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून शाळेवर कारवाई करण्यात येईल.

– माधवी तांडेल, शिक्षण अधिकारी, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Exam calling school violation corona rules private school ssh

ताज्या बातम्या