तुंगारेश्वरच्या जंगलात पुन्हा बिबटय़ाचे अस्तित्व?

वसईच्या तुंगारेश्वर अभयारण्यातून दोन वर्षांंपूर्वी नाहीसा झालेल्या बिबटय़ाचे अस्तित्व पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Leopard
प्रातिनिधीक फोटो

वसई : वसईच्या तुंगारेश्वर अभयारण्यातून दोन वर्षांंपूर्वी नाहीसा झालेल्या बिबटय़ाचे अस्तित्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या वसई तालुक्यातील तुंगारेश्वर अभयारण्यात बिबटे असल्याचा वनखात्याचा कयास आहे. या अभयारण्यात दोन बिबटय़ांचे अस्तित्व असल्याचा अंदाज वनखात्याने पावलांच्या ठशांवरून लावला आहे. २०१९ मध्ये झालेल्या प्राणीगणनेत एकही बिबटय़ा नव्हता. आता बिबटे असल्याची शक्यता निर्माण झाल्याने प्राणी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 सन २००३ साली तुंगारेश्वर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा ते मांडवीपर्यत तुंगारेश्वर अभायरण्याची हद्द आहे. आठ हजार ५७०.८० हेक्टर या वनपरिक्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे.

 पूर्वी मोठय़ा प्रमाणात विविध पशू आणि प्राण्यांचा वावर होता. त्यात बिबटय़ा, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्यप्राणी तर पोपट, मोर, बगला, घुबड, हळद्या, कोकिळा पावशा, सर्प, गरुड, महाभृंगराज, श्यामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्णपक्षी अशा  प्रजातीचा समावेश होता. २०१६ साली इकोलॉजी या वाईल्ड लाईफ कंझव्‍‌र्हेक्षशन सोसायटी व वनविभाग यांनी सर्वेक्षण केले होते त्यावेळी पाच बिबटे असल्याची नोंद करण्यात आली होती.  २०१७ मध्ये ती चारवर आली होती आणि  २०१८मध्ये फक्त एक बिबटय़ा शिल्लक होता. मात्र २०१९  मध्ये २३ वनरक्षकांमार्फत करण्यात आलेल्या प्राणी गणनेप्रमाणे बिबटय़ा तुंगारेश्वरमधूनच नाहीसा झालेला आहे. तुंगार (सातिवली) ,जूचंद्र (पाण्याची टाकी), दहीहंडी (चिंचोटी), पेल्हार धरण, पोमण, पायगाव अशा आठ पाणवठय़ाच्या ठिकाणी मचान बांधून वनरक्षक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने प्राणीगणना करण्यात आली त्यानंतर प्राण्यांची स्थिती समोर आली होती. जंगलात बिबटा नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.

दोन वर्षांनंतर वनक्षेत्रात पावलांचे ठसे

दोन बिबटय़ांचा वावर

करोना संसर्गापूर्वी या ठिकाणी प्राणिगणना करण्यात आली होती; मात्र त्यात केवळ एक बिबटय़ा आढळून आला होता. आता अभयारण्यात बिबटय़ाची संख्या एकने वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अभयारण्यात आता दोन बिबटय़ांचा वावर असल्याचा अंदाज वनविभागाने ठशांवरून वर्तवला आहे. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वनविभागाकडून प्राणिगणना केली जाते. पुढील वर्षी मे महिन्यात येथील प्राणिगणना झाल्यानंतर प्राण्यांची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Existence leopard forest tungareshwar ysh

Next Story
धोकादायक इमारतीचा प्रश्न प्रलंबित