scorecardresearch

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम

विरारजवळील अर्नाळा, आगाशी, वटार या भागात कोंबडय़ा बर्ड फ्लू या संसर्गाने दगावल्याचे समोर आल्याने पशुसंवर्धन विभागाने शोधमोहीम हाती घेतली आहे.

आतापर्यंत दोन हजार कोंबडय़ा नष्ट

वसई: विरारजवळील अर्नाळा, आगाशी, वटार या भागात कोंबडय़ा बर्ड फ्लू या संसर्गाने दगावल्याचे समोर आल्याने पशुसंवर्धन विभागाने शोधमोहीम हाती घेतली आहे. १ किलोमीटर परिघात ही शोधमोहीम सुरू केली असून आतापर्यंत दोन हजारहून अधिक कोंबडय़ांची  विल्हेवाट लावली आहे. मागील आठवडय़ात विरारजवळच्या अर्नाळा, आगाशी, बोळिंज परिसरातील भागात अचानकपणे कोणत्या तरी आजाराने कोंबडय़ांचा मृत्यू होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने घटनास्थळी धाव घेत मृत झालेल्या कोंबडय़ांचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. तेव्हा या कोंबडय़ांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असल्याचे निष्पन्न झाले. याच पार्श्वभूमीवर शनिवारपासून पशुसंवर्धन विभागाकडून अर्नाळा, आगाशी, वटार, यासह इतर ठिकाणच्या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.

जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पुणे वैद्यकीय शाळेचे अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पथकामार्फत बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या सुमारे १ किलोमीटर परिघात कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. त्यात आढळून येणाऱ्या कोंबडय़ा ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच हजार इतक्या कोंबडय़ांची विल्हेवाट लावून त्या ठिकाणचा परिसर हा र्निजतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. याशिवाय या भागातील एक किलोमीटरच्या भागात चिकन विक्रीच्या दुकानावरही सद्य:स्थितीत बंदी घालण्यात आली असल्याचे वसई पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exploration against background bird flu ysh