वसई: विरार पूर्वेच्या काशिद कोपर गावाला लागून असलेल्या डोंगरात जलकुंभ उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. डोंगर उत्खनन करण्यासाठी छोटे-मोठे स्फोट केले जात आहे. त्यांचे हादरे या भागातील घरांना बसून तडे गेले आहेत.
विरार पूर्वेच्या कशिद कोपर या भागात मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यामार्फत उभारण्यात येत असलेल्या जलकुंभ उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या जलकुंभ उभारणीसाठी होत असलेल्या उत्खननामुळे भविष्यात भूस्खलन होऊन ही गावे ढिगाऱ्याखाली गाडली जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करत याला तीव्र विरोध दर्शवत या जलकुंभ उभारणीचे काम बंद पाडले होते. मात्र काही दिवसांनी हे पोलीस बंदोबस्त घेऊन पुन्हा एकदा जलकुंभ उभारणी करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. या डोंगराला लागूनच काशिद कोपर ही गावे असून या ठिकाणी मोठय़ा संख्येने लोकवस्ती आहे, परंतु सध्या स्थितीत या भागात जलकुंभ उभारणी करण्यासाठी डोंगर उत्खनन करण्यासाठी सुरुंग लावून स्फोट केले जात आहे. त्यांची तीव्रता अधिक असल्याने त्याचे हादरे हे येथील भागातील घरांना जात असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. आतापर्यंत १० ते १२ घरांना याचा फटका बसला आहे. अधूनमधून असे स्फोट होत असल्याने याचा परिणाम येथील नागरी वस्तीवर होऊ लागला आहे. तर दुसरीकडे याचे प्रदूषणही आजूबाजूच्या भागात पसरू लागले आहे. जर अशाच प्रकारे काम सुरू राहिले तर या भागातील घरांना मोठय़ा प्रमाणात तडे जाऊन िभती कोसळून दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशात या कामामुळे नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान केले जात आहे. आता पावसाळाही तोंडावर आला असल्याने दुरुस्तीसाठी अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जलकुंभ उभारणी करण्यासाठी येथील नागरिकांचा विरोध असून ही मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून जबरदस्तीने काम सुरू केले आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
लढा सुरूच..
जलकुंभ हा अन्य ठिकाणी हलविण्यात यावा यासाठी येथील ग्रामस्थांचे मागील दीड महिन्यापासून साखळी आंदोलन सुरूच आहे. याशिवाय कायदेशीर मार्गानेही विविध विभागांना पत्रव्यवहार करून याबाबतचा लढा सुरूच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. येथील नागरी वस्तीचा विचार करून हा जलकुंभ इतरत्र हलविण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
जलकुंभ उभारणीसाठी या भागातील डोंगरात स्फोट केले जात आहेत. याचे हादरे या परिसरात बसून येथील घरांचे नुकसान होऊ लागले आहे. याचा मोठा फटका येथील नागरिकांना बसत आहे.— संदीप किणी, अध्यक्ष काशीद कोपर गाव बचाव संघर्ष समिती