वसई : चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वसईच्या शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामेच करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वसईच्या भागातील विविध ठिकाणी भातशेती केली जात आहे. वातावरणात झालेले बदल, वादळी वारे यामुळे होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडू लागले आहेत. यंदाच्या वर्षांतही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे करण्याकडे कृषी विभागाने पाठ फिरवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यात चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतीचे

पंचनामे करणे गरजेचे होते. ते न झाल्याने शासनाचे भात उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे ही मोठी चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी आम्ही कोणाकडे मांडायच्या, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

झोडणीनंतर येणारा भाताचा उतारा कमालीचा खालावलेला आहे. हा उतारा का कमी झाला आहे याची पाहणी कृषी विभागाने आवश्यक असताना ती केली नाही. तर रोगराईपासून बचावासाठी केलेली फवारणी सततच्या पावसामुळे परिणामकारक ठरली नाही. याचाही एकूण उत्पादनावर परिणाम झाला आहे. यापुढे भातशेती कसावी कीनाही असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला असून मागील काही वर्षांपासून भात उत्पादनात खर्चाच्या मानाने घट झाली आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यात शासनस्तरावरून मदतही मिळणेही कठीण झाले असल्याचे शेतकरी योगेश तरे यांनी सांगितले. तसेच यंदाच्या एकूण पावसाच्या स्थितीमुळे आजही शेतात नको तेवढा ओलावा आहे. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम हा रब्बी हंगामातील पेरण्यांवर झाला असून कठवळ पेरण्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान नाही

वसई परिसरात शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी केली आहे, परंतु तौक्ते चक्रीवादळानंतर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले नसल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. तसेच शासनाकडूनही पंचनामे करण्याच्या संदर्भात आदेश नसल्याने वसई तालुक्यात पंचनामे करण्यात आले नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी उमराव हातगळे यांनी सांगितले.