वसई:- वसई पश्चिमेच्या भागात तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसविलेल्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या आहेत. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास वर्तक विद्यालयाच्या समोरील भागात ही घटना घडली आहे. यादरम्यान कोणीही स्कायवॉक खाली नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
वसई विरार शहरात वसई रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसाठी स्कायवॉक तयार करण्यात आले आहेत.स्कायवॉकच्या खालील बाजूस फायबरच्या शिट बसविण्यात आल्या होत्या.बुधवारी अचानकपणे वसईच्या वर्तक महाविद्यालयाच्या गेट समोरच असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूच्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या.
या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून लोंबकळत असलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या फायबर शिट काढून टाकण्यात आल्या.रेल्वे स्थानकाला लागूनच हा परिसर असल्याने येथून प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची ये जा सुरू असते. मात्र घटना घडली तेव्हा कोणीही स्कायवॉक खाली नसल्याने अनर्थ टळला आहे.
वसईत स्कायवॉकचा भाग कोसळला ,सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही.
— LoksattaLive (@LoksattaLive) September 10, 2025
वसई:- वसई पश्चिमेच्या भागात तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसविलेल्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या आहेत. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास वर्तक विद्यालयाच्या समोरील भागात ही घटना घडली आहे. यादरम्यान कोणीही… pic.twitter.com/yu2XbsD1Nk
सद्यस्थितीत या स्कायवॉकचा वापर फारच कमी झाला आहे. हे स्कायवॉक वापराविनाच पडून आहेत. त्यामुळे हे स्कायवॉक धोकादायक बनत आहेत. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकचे लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी भाजपचे महेश सरवणकर यांनी केली आहे.
