खासगी रुग्णालयांकडून आर्थिक लूट सुरू

करोनाकाळात अनेक नागरिकांनी वाढीव देयकांच्या संदर्भात महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

करोनासंबंधी उपचारांचे दरपत्रक गायब

विरार : करोनाकाळात रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार समोर आल्याने पालिकेने सर्व रुग्णालयांना उपचाराचे दरपत्रक लावण्याची सक्ती केली होती, पण अनेक रुग्णालयांनी पालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवाच्या सवा देयक आकारण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. अजूनही रुग्णालयांनी आपले दरपत्रक लावलेले नाहीत. 

करोनाकाळात अनेक नागरिकांनी वाढीव देयकांच्या संदर्भात महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. यावरून पालिकेने देयक लेखापरीक्षण समितीची आखली होती. त्यानुसार शहरातील सर्व करोना उपचाराधीन रुग्णालयांना पालिकेने कोट्यवधींची देयके परत करण्यास भाग पडले होते. यावेळी सर्व रुग्णालयांना त्यांच्याकडील उपचार आणि सेवांचे दरपत्रक रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले होते. यावेळी लेखापरीक्षण समितीने रुग्णालयात जाऊन हे दरपत्रक लावले होते. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

परंतु पालिकेने लेखापरीक्षण समितीचा गाशा गुंडाळला असता रुग्णालयांनी हे दरपत्रक पुन्हा काढून टाकले आणि उपचाराच्या नावाखाली वेगवेगळ्या अनावश्यक चाचण्या, औषधे, उपकरणे वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी या नावाखाली रुग्णाकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार सुरू केले आहेत. 

अनेक रुग्णालये अधिक चाचण्या आणि औषधांचा अधिक वापर दाखवून देयक फुगविले असल्याचा आरोप रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे. यामुळे रुग्णालयात दरपत्रक असणे आवश्यक आहे, पण रुग्णालये सेवांचे दरपत्रक न दाखवता रुग्णाची लूट करत आहेत. यावर पालिकेने कारवाई करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

काय आहे नियम?

महाराष्ट्र शासनाने नर्सिंग अ‍ॅक्टमध्ये (महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार सर्व खासगी रुग्णालयांनी सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहेत.  यात प्रवेश शुल्क, प्रतिदिन आंतररुग्ण दर (अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रति भेट), सहायक वैद्य शुल्क (प्रति भेट), भूल शुल्क (प्रति भेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहायक शुल्क, भूल सहायक शुल्क (प्रति भेट), शुश्रूषा शुल्क (प्रति भेट), सलाइन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टिपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथालॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क इत्यादीचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. यातील ज्या सेवा रुग्णालये देत असतील त्यांचे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागी असावे असे सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात सर्व रुग्णालयांना आधीच सूचना दिल्या आहेत, परंतु काही रुग्णालये याचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे पालिकेने आता सर्व रुग्णालयांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे. जे रुग्णालये दरपत्रक लावणार नाहीत त्यांवर कारवाई केली जाईल – डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Financial looting from private hospitals continues corona related treatment tariffs disappear akp

Next Story
१३१ दिवसांत दीड लाख लसीकरण
ताज्या बातम्या