शहरात आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी नवीन अग्निशमन उपकेंद्रे

शहराच्या कुठल्याही भागात आग लागली तर लवकरच पोहोचता यावे यासाठी पालिकेने अग्निशमन उपकेंद्रांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रस्तावित अग्निशमन उपकेंद्राच्या निर्मितीच्या कामास गती देणार

वसई : शहराच्या कुठल्याही भागात आग लागली तर लवकरच पोहोचता यावे यासाठी पालिकेने अग्निशमन उपकेंद्रांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रस्तावित अग्निशमन उपकेंद्रांच्या निर्मितीच्या कामास गती देण्यात येणार आहे.

वसई-विरार शहर झपाटय़ाने वाढत आहे. शहरातील लोकसंख्या २५ लाखांहून  अधिक झालेली आहे. शहराच्या विविध भागात दाटीवाटीने अनेक वसाहती उभ्या राहात आहेत. आगीची वर्दी (कॉल) मिळाल्यावर पहिल्या पाच मिनिटात पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी अग्निशमन उपकेंद्रे पालिकेने तयार केली आहेत. पालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्रे नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे आहे. याशिवाय नालासोपाारा (श्रीप्रस्थ) वसईला (सनसिटी), वसई (तामतलाव), वसई पूर्व (नवघर), विरार पश्चिम (बोळींज), विरार पूर्व (फूलपाडा) अशी सहा उपकेंद्रे आहेत. पालिकेने एकूण १२ उपकेंद्रे प्रस्तावित केली होती. त्यापैकी मुख्यालयासह सहा उपकेंद्रे तयार झाली आहेत. नालासोपाऱ्यातील पेल्हार, वसई पूर्वेच्या वालीव, विरारमधील बोळींज, नवघर पूर्व, वसई गावातील जीजी महाविद्यालयाजवळ आणि नायगावच्या उमेळा आणखी सहा अत्याधुनिक उपकेंद्रे प्रस्तावित आहेत. त्याचे काम त्वरित हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली.

जागांचा शोध सुरू

शहरातील १२ प्रस्तावित उपकेंद्रे तयार करण्याबरोबरच आणखी नवीन उपकेंद्रे तयार करण्याचा विचार पालिकेने केला आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. दाटीवाटीने वसाहती आणि लोकसंख्या असेलल्या भागात ही अग्निशमन उपकेंद्रे तयार केली जाणार आहेत. महामार्गालगत मोठय़ा औद्योगिक आणि निवासी वसाहती तयार होत आहेत. त्या भागात एखादे उपकेंद्र तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले. नायगाव पूर्वेकडील उपकेंद्रे सागरी किनारा नियंत्रण क्षेत्रामुळे रखडले होते. त्याचे अडथळे देखील कायदेशीरीत्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचे पालव यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire substation accidents city ysh