वसई: मागील काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या वादळीवाऱ्यातून सावरत पुन्हा एकदा वसई विरार व उत्तन भागातील मच्छिमारांनी मासेमारीला सुरवात केली आहे. मात्र काही ठिकाणी मासेमारी करताना जेलीफिश जाळ्यात येत असल्याने मच्छीमारांच्या समोर आता आणखीन नवे संकट उभे राहिले आहे. यामुळे मच्छीमारांच्या पदरी निराशा पडली आहे.
वसईच्या नायगाव, अर्नाळा, पाचूबंदर, वसई कोळीवाडा, भाईंदर उत्तन भागातील अनेक मच्छीमार बांधव हे समुद्रात व खाडीत मासेमारी करतात. या मासेमारीच्या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र मागील काही वर्षपासून वातावरणातील अनियमितता, चक्री वादळे, समुद्रातील वाढते प्रदूषण अशा विविध प्रकारच्या अडचणीमुळे माशांची आवक कमी झाली आहे.
यंदाच्या वर्षी १ ऑगस्ट पासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे.मात्र हंगाम सुरू झाल्यापासून समुद्रात सातत्याने वादळी वारे निर्माण होत आहेत. मागील तीन महिन्यात आठ वेळा मासेमारीवरून पुन्हा माघारी परतावे लागले होते. त्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करणे कठीण होऊन बसले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या वादळीवाऱ्यातून सावरत पुन्हा एकदा वसई विरार व उत्तन भागातील मच्छिमारांनी मासेमारीला सुरवात केली आहे. मात्र काही ठिकाणी मासेमारी करताना जेलीफिश जाळ्यात येत असल्याने मच्छीमारांच्या समोर आता आणखीन नवे संकट उभे राहिले आहे. यामुळे मच्छीमारांच्या… pic.twitter.com/tqdvqNxdIX
— LoksattaLive (@LoksattaLive) November 14, 2025
नुकताच मुंथा चक्री वादळ आले होते. त्या चक्री वादळामुळे आठवडाभर मासेमारी बंद ठेवावी लागली होती. या चक्री वादळानंतर पुन्हा एकदा मच्छिमारांनी आपल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात सोडल्या आहे.
परंतु आता मच्छीमारांच्या जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने आणखीन नवे संकट उभे राहिले असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे. जिथे जेलिफिश असतात तिथे अन्य माशांच्या प्रजाती थांबत नाही. त्यामुळे मासे मिळणे ही कठीण झाले असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
जेलीफिशमुळे मासेमार आर्थिक संकटात
सातत्याने उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्त्यांमुळे मासेमारी व्यवसाय आधीच अत्यंत अडचणीत आला आहे. अशातच, मासेमारांच्या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या जेलीफिशमुळे जाळी फाटण्याचे प्रकार वाढत आहेत, परिणामी मच्छिमारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर, काहीवेळा यामुळे मासेमारांना शारीरिक दुखापत देखील होत आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून, शासनाने तातडीने मासेमारांना मदत जाहीर करावी अशी मागणी कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे.
पुन्हा पदरी निराशा
लाखो रुपयांचे इंधन फुकुन व इतर खर्च करीत मैल न मैल प्रवास करून समुद्रात जाळी टाकली होती. परंतु जाळी उचलताच त्यात जेलिफिश आढळून आले. केलेली मेहनत व खर्च पूर्णतः वाया जाते. मागील काही वर्षात समुद्रात वाढत्या जेलीफिश मुळे माशांच्या अन्य मत्स्य प्रजाती या कमी प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्याचा परिणाम हा मासेमारीच्या व्यवसायावर होत आहे.
