scorecardresearch

वादळीवाऱ्यामुळे बोटी किनाऱ्याला

वसईत आठशेहून अधिक बोटी आहेत. १ ऑगस्ट पासून या मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाली होती.

वादळीवाऱ्यामुळे बोटी किनाऱ्याला
वादळात मासेमारी करणे धोक्याचे असल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणण्यास सुरुवात केली आहे

वसई: दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मच्छीमारांनी आपल्या बोटी मासेमारी साठी खोल समुद्रात रवाना केल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसांपासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळीवाऱ्यामुळे मच्छीमारांना आपल्या माघारी आणाव्या लागल्या आहेत.

वसई पश्चिमेतील अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर या भागातील मोठ्या संख्येने कोळी बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. वसईत आठशेहून अधिक बोटी आहेत. १ ऑगस्ट पासून या मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाली होती.

मासेमारीसाठी जाण्यासाठी योग्य ती बोटींची डागडुजी, मासेमारी केल्यानंतर लागणारा बर्फ, विणलेली जाळी, बोटीसाठी लागणारे इंधन, जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमाव करून मच्छीमारांनी आपल्या बोटी खोल समुद्रात मासेमारी साठी नेल्या होत्या. यंदाच्या मासेमारीची सुरवात तरी चांगली होईल अशी आशा होती. मात्र मागील दोन दिवसांपासून समुद्रात वादळी वारे सुरू झाले आहे. वादळात मासेमारी करणे धोक्याचे असल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणण्यास सुरुवात केली आहे. पाचूबंदर, नायगाव, अर्नाळा अशा विविध किनाऱ्यावर बोटी परत आल्या आहेत. मंगळवारी अर्नाळा किनाऱ्यावर संध्याकाळी सहा वाजता काही बोटी किनार्‍यावर येवून स्थिरावल्या. मासेमारीसाठी गेलेल्या उर्वरित बोटी रात्री अकरा ते बारा पर्यंत  किनाऱ्यावर येण्याची शक्यता असून सर्व बोटी स्थानिकांच्या संपर्कात असल्याचे अर्नाळा येथील नागरिकांनी सांगितले आहे.या अचानक उद्भवलेल्या वादळाने अस्मानी संकटच नव्या मासेमारीच्या हंगामात कोळी समाजावर उद्भवले आहे. लाखोंचे इंधन फुकुन ही वादळीवाऱ्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.