झेंडूचा भाव वधारला; फूल उत्पादक शेतकऱ्याना दिलासा

वसई : मागील दोन वर्षांपासून करोनाच्या संकटामुळे कोमेजून गेलेला फूल बाजार या दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा फुलून गेला आहे.  झेंडू व झेंडूच्या तोरणांना अधिक मागणी असल्याने झेंडूचा भावही वधारला आहे. झेंडूची फुले ही ६० ते ७० रुपये किलोवरून १२० ते १५० रुपये किलोंच्या घरात गेली आहे. फूल उत्पादक शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.

 दसऱ्याला सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असते. त्यासोबतच चाफा, मोगरा, तगर, जास्वंद, शेवंती, नेवाली या फुलांचीही चांगलीच विक्री होऊ  लागली आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या आधी फुलांची मागणी फारच कमी होती. तर काहीवेळा फुलांचा माल तसाच पडून राहत असल्याने फेकून द्यावा लागत होता.  नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून थोड्याफार प्रमाणात विक्रेत्यांना दिलासा मिळाला  आहे.

सुरुवातीला ५० ते ६० रुपये किलोने विक्री केली जाणारी झेंडूची फुले दसऱ्याच्या पूर्वसंध्येला १२० ते १५० रुपयांच्या घरात गेली आहेत. इतर फुलांच्या किमतीही ६० ते ७० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. तसेच दसऱ्याला आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांपासून तयार केलेल्या तोरणांना मागणी असल्याने वसई-विरारमधील विविध ठिकाणच्या भागात तोरण विक्रीची लगबग सुरू असल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

पावसामुळे काही प्रमाणावर नुकसान 

वसईत मागे जोरदार पाऊस कोसळला होता. काही वेळ विश्रांती तर मध्येच मुसळधार हा खेळ सुरूच होता. याचा फटका फूल झाडांना बसला. यामुळे झाडावर तयार होत असलेली फुले ही पावसामुळे गळून पडली. आता पाऊस थांबल्याने पुन्हा चांगला बहर सुरू झाला आहे. आता कोणतेही संकट आले नाही तर येत्या सणासुदीच्या काळात फूल उत्पादक शेतकरी झालेल्या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करतील.