वसई: मालमत्ता कराची रक्कम वर्षानुवर्षे थकीत ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांवर पालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. सुमारे ८ हजार ५७१ इतक्या मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. दिलेल्या मुदतीत कर भरणा न झाल्यास त्या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाणार आहे.

वसई विरार भागात ९ लाखाहून अधिक छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका अशा विविध मालमत्ता आहेत. या मालमत्ताकरातून पालिकेला उत्त्पन्न मिळते. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र काही मालमत्ता धारकांनी वर्षानुवर्षे पालिकेचा मालमत्ता कर भरणा न केल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे.

हेही वाचा >>>जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

यावर्षी पालिकेने एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच कर संकलन करण्यावर भर दिला आहे. विशेषतः ज्या मालमत्ता धारकांनी मागील तीन ते चार वर्षांपासून कर थकीत ठेवला आहे त्या मालमत्ता धारकांवर लक्ष केंद्रित केले आहे.वेळोवेळी सूचना नोटिसा देऊनही कर भरणा करण्याकडे पुढे येत नसल्याने  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये

थकबाकी दारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार आता कारवाई करण्यास सुरवात झाली आहे.

आतापर्यंत महापालिकेने ८ हजार ५७१ इतक्या मालमत्तांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून त्यांची थकीत रक्कम ही २४ कोटी ७ लाख इतकी आहे. ज्या थकबाकीदारांनी वर्षानुवर्षे मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही त्यांना जप्तीपूर्व नोटीसा देण्यात आल्या असून नोटीसा वाटपाचे काम सुरु आहे. यानंतरही कर भरणा न केल्यास अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे.

हेही वाचा >>>वसई: ‘गुगल पे’ वरून स्वीकारली ३ हजारांची लाच; पोलीस शिपायाला रंगेहाथ अटक

चालू वर्षात १५१  कोटींचा कर वसूल

यंदाच्या वर्षी मालमत्ता कर संकलन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी एप्रिलपासूनच कराची देयके मालमत्ता धारकांना बजावण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विशिष्ट कालावधीमध्ये कर भरणा केल्यास मालमत्ता धारकांना विशेष सवलती सुद्धा पालिकेने जाहीर केल्या होत्या.याशिवाय संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यंदाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात आतापर्यंत पालिकेने १५१ कोटी ४३ लाख रुपये इतका मालमत्ता कर वसूल केला आहे.

मालमत्ता कर थकीत आहेत त्यांच्यावर आता कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. सुरवातीला जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. आता यात कर भरणा करण्यास पुढे येणार नाहीत त्यांची थकीत रक्कम लिलाव करून वसूल केली जाईल.- गणेश शेटे, उपायुक्त ( मालमत्ता कर संकलन) महापालिका