scorecardresearch

पालिकेचा माजी वैद्यकीय अधिकारी केवळ ९वी उत्तीर्ण; सुनील वाडकर प्रकरणात नवा उलगडा

डॉक्टर नसतानाही बेकायदा रुग्णालय चालवत असल्याबद्दल तुळिंज पोलिसांनी सुनील वाडकर याला अटक केली आहे.

|| सुहास बिऱ्हाडे

सुनील वाडकर प्रकरणात नवा उलगडा

वसई:  वसई विरार महापालिकेचा माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी केवळ ९वी उत्तीर्ण असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची प्रमाणपत्रे न तपासताच त्याला मुख्य वैद्यकीय अधिकारी पद देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. सुनील वाडकर हा तब्बल १४ वर्षे वसई विरार शहरात डॉक्टर बनून वावरत होता.

डॉक्टर नसतानाही बेकायदा रुग्णालय चालवत असल्याबद्दल तुळिंज पोलिसांनी सुनील वाडकर याला अटक केली आहे. त्याच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे यापूर्वीच सिध्द झाले होते. तपासात त्याने १२ वी उत्तीर्ण असल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र त्याच्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी तसेच इतर पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस मंगळवारी वाडकरच्या महाडमधील मूळ गावी गेले. तेथील चौकशीत त्याने शालेय शिक्षणही पूर्ण न केल्याचे समोर आले. त्याच्या शाळेतून ही माहिती मिळाली. जेमतेम नववी उत्तीर्ण असलेल्या सुनील वाडकरने मुंबईत आल्यावर आरती वाडकर या दंतचिकित्सक महिलेशी लग्न केले आणि नंतर स्वत: डॉक्टर बनून वावरू लागला. महाड गावात सुनील वाडकरचा भाऊ नारायण वाडकर सरपंच असून महाडमधील बंगला आरती वाडकर यांच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पालिका अधिकाऱ्यांची चौकशी होणार

२००७ मध्ये डॉ आरती वाडकर हिच्याकडे आरोग्य विभागात मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट होते. तिने आपल्या नववी उत्तीर्ण पतीला डॉक्टर बनवून वसई नगर परिषदेत नोकरीला लावले. यावेळी तिच्यात आणि महापालिकेत करार झाला होता. करारानुसार तिने सात दिवसात ठेक्यातून लागलेल्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे  महापालिकेत सादर करणे बंधनकारक होते. मात्र आरती वाडकरने प्रमाणपत्र सादर केले नाही. उलट २००९ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर वाडकर याला तत्कालीन आयुक्त किशोर बोर्डे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी बनवले. यामुळे आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former medical officer of the municipality passed only 9th new revelation sunil wadkar case akp