भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या कंत्राटदाराला एका खासगी संस्थेत १ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी आयुक्त दिलीप ढोले आणि त्यांच्या पत्नीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी ढोले दाम्पत्याला चौकशीसाठी हजर राहण्यास पोलिसांनी सांगितले आहे.
माजी आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रशासकीय पदावर असताना महापालिकेत कंत्राटदार म्हणून काम करणार्या महेश महाजन यांना सचिन मांगडे यांच्या संस्थेत गुंतवणूक करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. महाजन यांनी या संस्थेत जवळपास १ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली असून मांगडे यांनी मिरा रोड येथील आयुक्त बंगल्याबाहेर ही रक्कम घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून २०२५ मध्ये सचिन मांगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, हे प्रकरण आता पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. यात माजी आयुक्त ढोले आणि त्यांच्या पत्नीवर आरोप असल्याने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी दिली. या संदर्भात माजी आयुक्त दिलीप ढोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
संभाषणाचे कथित ध्वनिमुद्रण
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना माजी आयुक्त दिलीप ढोले यांच्या पत्नी सुजाता ढोले यांचे महाजन यांच्या आईसोबतचे संभाषण असलेली कथित ध्वनिमुद्रण समोर आले आहे. यात व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचा संशय आहे. सुजाता ढोले या देखील प्रशासकीय अधिकारी असून नवी मुंबई पालिकेत त्या अतिरिक्त आयुक्त होत्या.
