विरार :  उद्याने, हवा शुद्धी केंद्र आणि रंगरंगोटी, सजावटीचे उपक्रमांतर्गत आता वसई-विरार महापालिका शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकात कारंजे लावत आहे. यासाठी पालिकेने सहा ठिकाणे सध्या निवडली आहेत. वसई वसंत नगरी परिसरातील चौकात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक कारंजे सुरू केले आहे. तर इतर ठिकाणी लवकरच काम सुरू केले जाणार आहे. यासाठी पालिकेकडून १ कोटी ५७ लाख ६९ हजार ३३९ रुपये खर्च केला जाणार आहे.

वसई विरार महानगरपालिकेला राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत ३२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार वसई विरार महानगरपालिकेने उद्याने, रस्ते, नाके, तलाव सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. पालिकेकडून उद्यानांचा विकास सुरू असताना आता शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकसुद्धा सुशोभित केले जाणार आहेत.

यासाठी मुख्य रस्त्याच्या मोठय़ा चौकांची निवड करून त्यावर कारंजे लावून रोषणाई केली जाणार आहे. सध्या सहा ठिकाणे पालिकेने निवडली आहेत. यात वसईच्या वसंत नगरी परिसरातील काम पूर्ण झाले आहे.

वसंत नगरी येथील कारंजे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले होते. हे कारंजे आणि येथील रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

पालिका इतरही काही ठिकाणे शोधात आहे. तसेच नागरिकांना या संदर्भात काही सूचना अथवा नव्या कल्पना असल्यास त्यांनी बांधकाम विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे.

कारंजांची ठिकाणे

विरार पश्चिम येथील डोंगरपाडा नाका, बंजारा हॉटेल येथील नाका, जुना जकात नाका, वसई सातावली येथील नाका,  अग्रवाल येथील नाका अशा ठिकाणी लवकरच कामे सुरू होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली आहे.