विरार : इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणाचा धोका पाहता, वसईतील वर्तक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी एक तीनचाकी गाडी बनवली आहे. विद्यार्थ्यांनीच संपूर्णपणे परिश्रम करून ही गाडी केवळ चार लाखांच्या किमतीत बनवली आहे.
वसईतील वर्तक महाविद्यालयातील अभियांत्रिकी शाखेसह मॅकेनिकल, आय टी, संगणक विभागातील ४० मुलांनी ही कार बनवली आहे. त्यांनी शैक्षणिक प्रकल्प म्हणून २०१७ पासून ही कार बनविण्यास सुरुवात केली होती. आधी मुलांनी विद्युत कार बनवली होती. त्यातच अधिक संशोधन करून त्यांना आता सौर पॅनलचा वापर करून ही कार दोन्ही पद्धतीच्या ऊर्जेवर चालू शकेल, अशा प्रकारे विकसित केली आहे. विद्युत तर सौर ऊर्जेवर ही कार चालू शकेल.
ही तीनचाकी कार ताशी ६५ किमी वेगाने धावू शकते. त्याचबरोबर एकदा चार्ज केल्यावर किमान १२५ किमी प्रवास करता येतो. अजूनही ही कार थेट रस्त्यावर उतरली नाही पण भविष्यातील इंधन पर्याय म्हणून याकडे नक्कीच पाहता येईल. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रा. चौधरी म्हणाले की, अद्याप या कारची स्वामित्व नोंदणी केली नाही, पण लवकरच आम्ही त्या दिशेने पावले उचलणार आहोत. या कारचे वैशिष्टय़ म्हणजे चालकाविनाही ती चालवता येईल. एक ठरावीक मार्ग आखून दिला असता, कोणत्याही मानवी साहाय्याविना ही गाडी इच्छितस्थळी घेऊन जाईल. विद्यार्थ्यांनी या गाडीसाठी विशेष मेहनत घेतली आहे. लवकरच ते चारचाकी आणि दुचाकी गाडय़ाही बनवणार आहेत.
