दोन जणांना अटक; ६ हजार रुपये भाडय़ाच्या लालसेपोटी ५ लाख गमावले

वसई : संकेतस्थळावर आपले घर मासिक ६ हजार रुपये भाडय़ाने देणे भाईंदरमधील एका इसमाला चांगलेच महागात पडले. ठकसेनाने घर भाडय़ाने घेण्याच्या बहाण्याने ऑनलाइन व्यवहारात हातचलाखी दाखवून तब्बल ६ लाखांचा गंडा घातला आहे. काशिमीरा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना राजस्थान येथून अटक केली आहे.

विनोद मिश्रा हे मीरा रोड येथील सृष्टी परिसरात राहतात. त्यांना त्यांचे घर भाडय़ाने द्यायचे होते. आपल्या घराची माहिती त्यांनी गृह खरेदी-विक्री करणाऱ्या ब्रिक्स डॉट कॉम या संकेतस्थळावर टाकली होती. त्याला दिल्लीतील एका कर्नलने प्रतिसाद दिला. मी कोलकाता येथील डमडम विमानतळावर सुरक्षा अधिकारी असून नवी मुंबईत नेमणूक झाली आहे. त्यासाठी तातडीने घर भाडय़ाने हवे असल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशी मिश्रा यांनी आपल्या पैशांची मागणी केली. त्यावेळी ठकसेनाने पुन्हा तीच पद्धत वापरली. त्याला भुलून मिश्रा यांनी तीन वेळा प्रत्येकी १ लाख रुपये पाठवले. त्यांच्या खात्यातील पैसे संपल्याने त्यांनी मुलगी प्रतीक्षा मिश्रा हिच्या खात्यातील १ लाख पाठवले. आतापर्यंत मिश्रा यांनी ठकसेनाला ४ लाख २० हजार दिले होते. ती रक्कम परत करण्यासाठी आणखी ७२ हजार रुपये जीएसटी भरावे लागतील अशी आणखी एक थाप त्याने मारली. मिश्रा यांनी त्याच्या या थापेलाही बळी पडून पुन्हा ७२ हजार भरले. जवळपास ५ लाखांची रक्कम त्यांनी ठकसेनाला ऑनलाइन ट्रान्स्फर केली होती. यानंतर ठकसेनाने आपला फोन बंद केला आणि मग आपली फसवणूक झाल्याचे मिश्रा यांच्या लक्षात आले.

मिश्रा हे संगणक क्षेत्रातील व्यवसायात असूनही ते ठकसेनाला बळी पडल्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटले. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सायबर सेल आणि तांत्रिक मुद्दय़ांच्या आधारे तपास करून दोन आरोपींना राजस्थान येथून अटक केली, अशी माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

अशी ऑनलाइन हातचलाखी

घराचे डिपॉझिट २० हजार रुपये पाठविण्यापूर्वी पेटीएमवर आधी एक रुपया पाठवला. मात्र तो मिश्रा यांना मिळाला नाही. मग तुम्ही मला २० हजार रुपये पाठवा मी तुम्हाला ४० हजार रुपये पाठवतो असे त्याने सांगितले. त्यावर विश्वास ठेवून मिश्रा यांनी २० हजार रुपये पाठवले. मात्र ते देखील मिळाले नसल्याचे ठकसेन कर्नलने सांगून पुन्हा २० हजार रुपये पाठवायला सांगितले. अशा प्रकारे ५ वेळा मिश्रा यांनी ठकसेनाला जवळपास २० हजारप्रमाणे १ लाख रुपये पाठवले. मी तुम्हाला तुमचे १ लाख आणि डिपॉझिटचे २० हजार असे १ लाख २० हजार परत करतो पण माझे एटीएम खराब आहे असे सांगून वेळ मारून नेली. माझे ऑफिस बंद होत असून उद्या ऑनलाइन पैसे पाठवतो अशी बतावणी केली. त्यावर  देखील विश्वास ठेवला.