वसई: वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पालिकेच्या रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा पुरविल्या जात आहेत. यापूर्वी त्या सेवांचे फलक नसल्याने रुग्णांना अडचणी येत होत्या. अखेर पालिकेने रुग्णालयात सेवांचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेची माहिती उपलब्ध होणार आहे.
वसई विरार महापालिका क्षेत्रात पालिकेची रुग्णालये व आरोग्य केंद्र, माताबालसंगोपन केंद्र आहेत. यातून शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य सेवा या मोफत पुरविल्या जात आहेत.
यात उपचार घेण्यासाठी नागरिक जात असतात. परंतु रुग्णालयांच्या बाहेर व दर्शनी पुरविल्या जात असलेल्या सेवांचे फलक नसल्याने रुग्णांना रुग्णालयाच्या अंतर्गत कोण कोणत्या सेवा पुरविल्या जात होत्या याची माहिती मिळत नव्हती.
तर काही ठिकाणी रुग्णांना बाहेरून विविध प्रकारच्या तपासण्या व रिपोर्ट काढण्यासाठी पाठविले जात होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. तर सर्वसामान्य नागरिकही जवळच्या भागातच मिळणाऱ्या सोयीसुविधा पासून वंचित राहावे लागत होते. याच अनुषंगाने भाजपाचे मनोज बारोट यांनी पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात पालिकेकडून ज्या मोफत वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत. याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे जेणेकरून रुग्णांना याची माहिती मिळेल अशी मागणी पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच महानगरपालिकेने प्रत्येक केंद्रासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून मदत कक्ष व मध्यवर्ती तक्रार कक्ष तयार करून त्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही फलकावर लावावेत. जेणेकरून मोफत सेवा न मिळाल्यास रुग्ण मदत घेऊ शकेल किंवा तक्रार करू शकेल असेही त्यांनी निवेदनात सांगितले होते. अखेर पालिकेच्या आरोग्य विभागाने पालिकेच्या रुग्णालयातील दर्शनी भागात आरोग्य सेवांचे फलक लावण्याच्या सूचना रुग्णालयांना केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना मोफत आरोग्य सेवांविषयीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
