भाईंदर :- जवळपास अकरा वर्षांपासून मिरा-भाईंदरच्या राजकारणापासून दूर राहिलेले मंत्री गणेश नाईक आता पुन्हा एकदा शहराच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जनता दरबार घेणार आहेत. या माध्यमातून भाजपच्या संघटनेला मोठे बळ मिळेल, असा दावा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

आगामी काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी पक्षसंघटना मजबूत करणे आणि नागरिकांशी थेट संपर्क वाढवणे या उद्देशाने भाजपने विशेष रणनीती आखली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेते तथा मंत्री शासनाच्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत जनता दरबार आयोजित करत आहेत. या कार्यक्रमांद्वारे नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहतात.

या उपक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यात जनता दरबार घेऊन पालघरचे पालकमंत्री व वनमंत्री गणेश नाईक चर्चेत आले होते.त्याच धर्तीवर नाईक आता १५ नोव्हेंबर रोजी मिरा-भाईंदरमध्ये जनता दरबार घेणार आहेत. महापालिकेच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात दुपारी १ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मिरा-भाईंदरमध्ये भाजप व शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असल्याने, नाईकांच्या या जनता दरबाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मंत्री प्रताप सरनाईकांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपची खेळी

राज्यात महायुतीमध्ये आलबेल वातावरण असले तरी मिरा-भाईंदरमध्ये भाजप व शिवसेना यांच्यात सुरुवातीपासूनच वाद राहिला आहे.या शहरात दोन विधानसभा मतदारसंघ असून यातील मिरा भाईंदर विधानसभा क्षेत्रात आमदार नरेंद्र मेहता भाजपकडून नेतृत्व करतात, तर ओवळा-माजीवडा क्षेत्राचे प्रतिनिधित्व मंत्री प्रताप सरनाईक करतात.अलीकडच्या काही महिन्यांत भाजपमधील नाराज नेत्यांना आपल्या गोटात घेऊन शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याचे काम सरनाईक करत आहेत. तसेच सरनाईकांनी आपल्या मंत्रिपदाचा मोठा प्रभाव शहरात निर्माण केल्याने भाजप अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरनाईकांचा प्रभाव कमी करून संघटनात्मक पातळीवर बळकटी आणण्यासाठी भाजपने मिरा-भाईंदरमध्ये गणेश नाईकांची एन्ट्री करण्याची खेळी केली आहे.

गणेश नाईक यांचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्यता

२०१४ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईकांचा ठाणे आणि मिरा-भाईंदर शहरात प्रचंड प्रभाव होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि संजीव नाईक यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी मोठी समर्थकांची फळी उभी केली होती. मात्र मोदी लाटेनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांचा शहराशी असलेला संपर्क कमी झाला.तरी देखील आजही त्यांना मानणारा एक मोठा समर्थकवर्ग मिरा-भाईंदरमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच मोठा फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.