वसई: पालघर जिल्हा कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांचे जनता दरबार पार पडत असले तरी वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी एकही जनता दरबार झाला नव्हता. मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर गणेश नाईक यांचा शुक्रवारी महापालिकेत जनता दरबार पार पडणार आहे.

महापालिकेतील हा पहिलाच जनता दरबार असून एकप्रकारे हितेंद्र ठाकूर यांचे पालिकेवर असलेले वर्चस्व कमी करण्यासाठी हा दरबार आयोजित केला गेला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने पालघर जिल्ह्यासह वसई विरार च्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राखले आहे. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीही भाजपने कंबर कसली आहे.

वसई विरार महापालिकेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. यापूर्वी झालेल्या २०१० आणि २०१५ या दोन निवडणुकांमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वर्चस्व ठेवले होते. त्यामुळे वसई विरार महापालिका हा ठाकुरांचा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. आता विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत सुरुंग लावण्यासाठी भाजप सक्रिय झाली आहे. विविध प्रकारचे धक्का तंत्र वापरून ठाकुरांची कोंडी करण्याचा ही प्रयत्न केला जात आहे.

मंगळवारी पालिकेची आरक्षण सोडत पार पडली. त्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. वसई तालुका आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी या जनता दरबार घेण्यात येत आहे.

यापूर्वी केवळ पालघर जिल्हा कार्यालयात जनता दरबार घेतले जात होते. महापालिकेतील नाईकांचा हा पहिलाच जनता दरबार आहे. निवडणूकीच्या अगदी तोंडावरच हा जनता दरबार घेतला जात असल्याने शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा जनतादरबार आयोजित करून भाजपला तर बळ मिळेल, परंतु हितेंद्र ठाकूर यांची पुन्हा राजकीय कोंडी करण्यासाठी भाजपची रणनीती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ठाकूरांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न ?

मागील ३५ वर्षांपासून वसई विरार शहरात तिन्ही मतदारसंघ आणि महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने बविआला मोठा धक्का देत तिन्ही मतदार संघ काबीज केले. आता महापालिकेतही सत्ता मिळावी यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. यासाठी हितेंद्र ठाकूर यांची विविध मार्गाने कोंडी करून त्यांचे वर्चस्व कमी

करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाकूरांना रोखण्यासाठी धक्कातंत्राचा वापर ?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी महापालिकेत वर्चस्ववादी ठरलेल्या बहुजन विकास आघाडीला रोखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. यापूर्वी भाजपने बविआ पक्षातील माजी नगरसेवक, प्रमुख नेते व कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात सामील करून घेत बविआला धक्का दिला होता. आता ही विविध राजकीय खेळी करीत भाजप कडून बविआला धक्का देण्याचा प्रयत्न होत आहे.