लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

सई : नालासोपार्‍यात सामूहिक बलात्काराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पूर्वेला राहणार्‍या एका विवाहित महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला आहे. तुळींज पोलीस याप्रकरणी दोन स्थानिक गुंडांचा शोध घेत आहेत. मागील २० दिवसातील नालासोपारा शहरातील सामूहिक बलात्काराची ही चौथी घटना आहे.

३२ वर्षीय पीडित महिला आपल्या कुटुंबियांसह नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन परिसरात राहते. मंगळवार १० सप्टेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास ती आपल्या मुलाला क्लासवरून आणण्यासाठी नालासोपारा पूर्वेच्या मोहरा हायस्कूल येथील गुलाब गल्लीत गेली होती. त्यावेळी जितेंद्र यादव उर्फ काटू याने पीडित महिलेचे तोंड दाबून तिला बळजबरीने गल्लीतून खेचून जवळील एका खोलीत नेले. तेथे जितेंद्र यादव आणि अवी जैस्वाल उर्फ बिल्लू या दोघांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

आणखी वाचा-वसई-विरारमधील पशुवैद्याकीय रुग्णालयाला विलंब

सुरवातीला धमकीमुळे घाबरून महिलेने तक्रार केली नव्हती. मात्र तिच्या कुटुंबियांनी या गुंडाविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७० (१), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मागील २० दिवसात नालासोपाऱ्यात सामूहीक बलात्काराची ही चौथी घटना आहे. यातील एक प्रकरण आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर तीन घटना तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. दोन प्रकरणात अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

मागील काही दिवसातील नालासोपार्‍यातील सामूहिक बलात्काराच्या घटना

३ सप्टेंबर २०२४- कामाच्या शोधासाठी आलेल्या महिलेवर नालासोपार्‍याच्या धानिव बाग येथे दोघांचा सामूहिक बलात्कार

९ सप्टेंबर २०२४- गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षांच्या मुलीवर दोन इसमांकडून शिर्डीनगर येथे सामूहिक बलात्कार

२२ ऑगस्ट २०२४- नालासोपारा येथील धानिव बाग परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार.