भाईंदर: इराण व इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्व भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारतातही इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा आता एचपी गॅस वितरकांकडून करण्यात आला आहे. याबाबतचे संदेश थेट संस्थेकडून ग्राहकांना पाठवण्यात येत आहेत.
पश्चिम आशियातील संघर्ष लक्षात घेता घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत. त्या संदर्भात तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती गॅस पुरवठ्यातील अडचणी तसेच हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या समितीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यांच्या कार्यकारी संचालकांचा समावेश आहे.
दरम्यान, देशातील काही प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा असून अनेक हॉटेल बंद होत असल्याची बाब समोर येत आहे. तसेच देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असून घरगुती गॅसही बंद होणार असल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही जण आगाऊ सिलेंडर नोंदणी करून साठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही परिस्थिती शांत करण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार वितरक आपल्या ग्राहकांना संदेश पाठवून इंधनाच्या तुटवड्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करत आहेत. तसेच देशाकडे पर्याप्त इंधनसाठा उपलब्ध असल्याचा दावा देखील या संदेशांमध्ये करण्यात आला आहे. इंधनाचा नेहमी जपून वापर करणे गरजेचे असून नागरिकांनी पुढेही तसेच करावे, असेही या संदेशात नमूद करण्यात आले आहे. एकंदरीत कंपन्यांकडून येणाऱ्या या संदेशांमुळे काही नागरिकांमध्ये दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
किरकोळ बाजारात भाज्या महाग होण्याची भीती
जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची तसेच त्यांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात काही भाजी विक्रेत्यांनी अचानक फळे व भाज्यांचे दर वाढवल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
