Ghodbunder Road Accident: घोडबंदर येथील जे. पी. इन्फ्रा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अवजड वाहनाने एका दुचाकीस्वार तरुणाला त्याच्या राहत्या इमारतीबाहेरच ठोकर दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंश सुजित बागल (१७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो घोडबंदर येथील अपना घर संकुलाचा रहिवासी होता. रविवारी रात्रीच्या सुमारास तो दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला होता. दरम्यान, संकुलाबाहेरील रस्त्यावर गाडी वळवत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट-काँक्रीट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याची दुचाकी वाहनाखाली अडकली, तर तो काही अंतरावर फेकला गेला. जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. अवजड वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.दरम्यान, यापूर्वीही या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
