भाईंदर :-ठाणे-घोडबंदर मार्गावर रस्ता ओलांडताना अपघात घडू नयेत म्हणून पादचारी पुलांची उभारणी केली जात आहे. यात एकूण पाच पूल उभारले जात असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.

घोडबंदर मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. शिवाय, या मार्गावर मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. रस्ता ओलांडताना काही नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. याठिकाणी पादचारी पूल उभारणीची मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएकडे केली होती.

त्यावरून २०२३ मध्ये यासाठी जवळपास दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रामुख्याने पाच ठिकाणी हे पूल उभारण्यात येत आहेत. यामध्ये कासारवडवली, ओवळा, भायंदरपाडा व गायमुख या ठिकाणांचा समावेश आहे. त्यानुसार आता या पुलांची उभारणी जवळपास पूर्ण झाली असून लवकरच याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तात्पुरते रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती

ठाणे-घोडबंदर मार्गावरील वर्सोवा ते गायमुख दरम्यान असलेल्या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी हा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यानुसार रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत महापालिकेने वनविभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अद्यापही यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही परवानगी मिळेपर्यंत अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेला परिसर मोकळा करून तो रुंद करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.